लोकांनी वेळ काढून साहित्य संमेलनात यावं असं तिथे काय असतं?

किती साहित्यिक लोकांच्या प्रश्नांवर तोंड उघडतात? त्यांचे एकुणात प्रमाण किती?
किती साहित्यिक ठोस भूमिका घेतात? किती साहित्यिक लोकांना आपल्या जवळचे वाटतात?

 

अंमळनेर हे सरकारी माहितीनुसार 135000 लोकसंख्येचे छोटेसे शहर आहे. यातील 32000 लोकांना उपजिविकेचे साधन आहे. यात व्यवसाय, उत्पादन, नोकरी, रोजंदारी, फेरीवाले आणि मजूर सामील आहेत. पैकी 18 टक्के लोकांची कामे रोजच्या खर्चास मेळ घालण्यास अपुरी आहेत.

 

या छोट्याशा अल्पउत्पन्न असणाऱ्या शहरातील नागरिकांनी या संमेलनात का यावं?
त्यांची नि लिहित्या लोकांची नाळ जुळलेली असल्याचे एखादे ठळक उदाहरण आहे का?

 

लोकांनी का पुस्तके विकत घ्यावीत? तीन – चार पुस्तके विकत घ्यायची म्हटले तरी हजारेक रुपडे पडतात? लोकांना फालतू ठिकाणी पैसा खर्चायला आवडतो मात्र पुस्तके विकत घ्यावीशी वाटत नाहीत याचा दोष सर्वस्वी वाचकांच्या माथी मारायचे पाप अजून किती वर्षे करणार?

आताच्या काळात पुस्तके वाचली जावीत यासाठी कुठली यंत्रणा वा संस्था जिवाचे रान करतेय का? किती लेखक रूटलेव्हलशी अजूनही जुळून आहेत? अंमळनेरच नव्हे तर राज्याच्या कुठल्याही तालुका स्तरीय छोट्या शहरातील सामान्य मराठी माणसाला तुम्ही रस्त्यात अडवून विचारलं की या दोन दशकात लेखन करणाऱ्या किमान पाच लेखकांची नावे सांग – न अडखळता एकही माणूस नावे सांगू शकणार नाही!

 

सामान्य जनतेपैकी किती लोकांना आताच्या कवितेविषयी ममत्व वाटते?
आणि ममत्व तरी का वाटावे?
अशी कोणती तेजस्वी ‘प्रतिभे’ची माय त्यात व्यालेली दिसते किती प्रकाशक पुस्तकांचा पारदर्शक व्यवहार करतात? पुस्तकांच्या किंमती आणि पानांची संख्या नि त्यातलं कंटेंट यांचा कोणता मेळ सामान्य माणसाने घालावा?

 

जीव उचंबळून यावं असं काय त्या साहित्य संमेलनात घडतं?

सामान्याच्या मनातलं काही गूज तिथे मांडलं जातं का?कवी कट्ट्याला किती श्रोते हजर असतात? आणि त्यांनी का हजर राहावं?
दिवसभरात हजारेक कवी तिथे आपल्या ‘काव्यप्रतिभेचे खोबरे’ उधळत असतात त्याचा ‘भंडारा’ झेलावा तरी कुणी?
किती कवी एकमेकांच्या कविता मनापासून ऐकतात? लोकांनी तरी या ‘शब्दफळव्या’ कवितांना का ऐकावं?

अगदी प्राथमिक शाळेपासून ते थेट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सक्तीने वाट्यास येणाऱ्या शालेय वाचनाखेरीज आताची पिढी अवांतर मराठी वाचन करत नाही हे वास्तव कुणीच स्वीकारणार नाही का?

पूर्वी लोक पाककलेची नि सक्सेसफुल जीवनाच्या गुरुकिल्लीची पुस्तके तरी खरेदी करत असत आता ऑनलाइन मटेरियलच इतके झालेय की घरोघरी शेफ तयार झालेत आणि जो तो उठून यशस्वी आयुष्याचा मंत्र दुसऱ्याला फॉरवर्ड करत असतो!
अलीकडील काळात प्रवासवर्णने, निबंध, स्फुट, बालसाहित्य या वर्गवारीतले साहित्य मरणपंथाला लागलेय.

दंभाने शिगोशिग भरलेल्या साहित्यिकांचे अहंकारीक वाद आणि कंपू यात सामान्य मराठी माणसाला शून्य स्वारस्य आहे. तो आधीच वैतागलेला आहे.
तेच साठोत्तरीच्या गवऱ्या म्हसणात गेलेल्या मढयाचे कीर्तन आणि तिच ती नव्वदोत्तरीची पिपाणी!

शिवाय दर आठवड्याला राज्यात कुठे न कुठे कसले ना कसले साहित्य संमेलन असतेच असते! त्याचाही स्वागताध्यक्ष असतो नि उद्घाटक असतो हे विशेष!
आता एका व्यक्तीने एकाच श्रोत्यासाठी संमेलन भरवायचे राहिलेय!

विशिष्ठ विचारांच्या नि वादांच्या टोळ्यांनी आपआपल्या आवडत्या लेखकास मखरात बसवून त्याच्या आरत्या तरी किती ओवाळायच्या! समीक्षकांनी लेखकांच्या पाठी खाजवायच्या आणि लेखकाने त्याला झेलायचे हेच इथले सहजीवन का?
हे एकमेकाची इतकी पाठ खाजवतात की यांच्या तळहातास खरूज होण्याची वेळ आलीय! हे कुठे तरी थांबणार की नाही?

लिहित्या हातांनी जागं होण्याची ही वेळ आहे! नुसती वरुन भपकेबाजी असणारी नि आतून बकाल ओसाड असणारी संमेलने भरवून चालणार नाही! बाकी ते सरकारी अनुदान या विषयावर लिहून लेखणीची चव घालवायची इच्छा नाही.

– समीर गायकवाड

इथे मांडलेल्या प्रत्येक गृहितकास काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत मात्र अपवाद म्हणजे सकल संपूर्णाचे प्रतिबिंब नव्हे! तिखट भाषेने ‘भावना’,’अस्मिता’ दुखावल्या गेल्या तर चार चांगली पुस्तके वाचून त्यांना शांत करावे

Spread the love
error: Content is protected !!