आपली खरी ओळख काय ?

हा प्रश्न भारतीयांना गोंधळवून टाकणारा असला, तरी आपली खरी ओळख जगाला आता होवू लागली आहे,जी भारतीयांनी संपूर्ण जगात आपल्या वर्तनातून निर्माण केली आहे.

 

हे जग अनेक प्रकारच्या कलहांमधे होरपळत असताना,रशिया आणि युक्रेन मधे भयंकर युद्ध सुरू असताना, हे युद्ध समाधानकारक शांतिवार्ता करून थांबवण्यासाठी या दोन्ही देशांचे राष्ट्र प्रमुख भारतीय पंतप्रधानांशी दीर्घ चर्चा करतात, त्यामागील विश्वास ही आपली खरी ओळख आहे.

 

सौदी अरेबिया आणि येमेन यांच्यातील युद्धात तिथे अडकून पडलेल्या जगातील अनेक देशांच्या नागरिकांची तिथून सुटका करण्याचे अभियान भारत सरकारने राबविताना आपल्या विनंती वरून रोज दोन तास युद्ध विराम होत होता,ही आपली खरी ओळख आहे.

 

सारे जग कोरोनाने होरपळत असताना लक्षावधी लोक मृत्युमुखी पडत असताना भारताने स्वत:च्या गुणवत्तेने विकसित केलेल्या लशींनी आपल्या कोट्यवधी लोकांना तर आपण वाचवलेच,पण त्याशिवाय जगातील अनेक राष्ट्रांना लशीचे डोस केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून विनामूल्य पुरवले,ज्याबद्दल हे जग भारताप्रति कृतज्ञ राहील, ही आपली खरी ओळख आहे.

 

जगातील अनेक देशांना चीनच्या विस्तारवादी युद्धखोर अरेरावीचा आणि चीनच्या कर्जाचा विळखा बसून त्यांचा श्वास कोंडत असताना सारे जग भारताकडे आशेने पाहते आहे, ही आपली खरी ओळख आहे.

 

जगातील अनेक मोठ्या काॅर्पोरेट कंपन्या, वित्तसंस्था त्यांच्या प्रगतीसाठी विश्वसनीय आणि गुणवान मनुष्यबळासाठी भारताकडे पाहतात, आणि हा विश्वास सार्थ ठरवत अनेक कंपन्यांचे कार्यकारी प्रमुख होण्यापर्यंत भारतीयांनी मारलेली मजल ही आपली खरी ओळख आहे.

 

आपले सन्माननीय पंतप्रधान जगातील अनेक देशात दौरा करीत असताना त्यांचे तिथे होणारे स्वागत काही ठिकाणी संस्कृत भाषेतून,कधी मंत्रोच्चार करून, कधी संस्कृत प्रार्थनेने,कधी त्या त्या राष्ट्र प्रमुखांनी व त्यांच्या पत्नीने भारतीय पोशाख परिधान करून केले,ही आपली खरी ओळख आहे.

 

आपल्या प्राचीन सभ्यतेचा,संस्कृतीचा,आध्यात्मविद्येचा आणि हिंदू धर्माचा सारांश असलेली श्रीमद्भगवद्गीता जेव्हा आपले पंतप्रधान व्हॅटिकन सिटीत सर्वोच्च ख्रिस्ती धर्मपीठाच्या पोप यांच्या पासून जगाच्या अनेक राष्ट्र प्रमुखांना प्रेमाने भेट देतात, आणि ती आदराने स्वीकारली जाते,ही आपली खरी ओळख आहे.

 

या जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी बळ, तसेच विध्वंसक अस्त्रे,शस्त्रे असतानाही भारत कधीही कोणावरही पहिला वार करणार नाही,हा जगाला वाटणारा विश्वास ही आपली खरी ओळख आहे.

 

स्वत:च्या हिंदू परंपरेचा सार्थ अभिमान आणि पालन करणा-या आपल्या पंतप्रधानांना ईस्लामची जन्म भूमी असलेल्या सौदी राजघराण्याने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले, ही आपली खरी ओळख आहे.
विश्वकल्याणाची आपण मनोमन करीत असलेली कामना,आपले चारित्र्य,प्रेम,करुणा, सहृदयता, सुसंस्कृतपणा, सहिष्णुता ही आपली खरी ओळख आहे.

 

जगातील उत्तमोत्तम तंत्रज्ञान आत्मसात आणि विकसित करीत असताना,स्वत:चा आर्थिक स्तर उंचावत असताना, लष्करी सामर्थ्य संपादन केले असतानाही या सर्व गोष्टींचा उपयोग या जगाच्या हितासाठी आणि अखेरच्या मनुष्याच्या कल्याणासाठी करण्याचा शुद्ध हेतू,ही आपली खरी ओळख आहे.

 

गतकाळात ज्यांनी भारतीयांचे अपार शोषण आणि भारतीय संस्कृतीचा अनेक प्रकारे विध्वंस आणि लूट केली, त्यांच्याबद्दलही आमच्या मनात यत्किंचितही किल्मिष आम्ही बाळगले नाही.आम्हाला क्रौर्य आणि शौर्य यातील अंतर समजत असल्याने उलट आमचा त्यांच्याशी असलेला व्यवहार सहृदयतेचाच राहिला आहे,ही आपली खरी ओळख आहे.

 

या अनंत प्रकारचे वैविध्य असलेल्या जगाच्या पाठीशी एकच ईश्वरी सत्ता आहे,ही दृढ धारणा,ही आपली खरी ओळख आहे.मनुष्य आणि समाज व राष्ट्र हे स्खलनशील असते, त्यामागे अनिवार लालसा, महत्त्वाकांक्षा आणि अज्ञान असते व या सा-यातून उद्भवणारे कलह मानवी जीवनातील सुखाला ग्रहण लावतात,सारी मानवजात दुःखाने होरपळून निघते, त्यावरील उपाय म्हणजे आपण सारे वरवर वेगळे दिसत असलो तरी एकाच ईश्वराची आपण लाडकी अपत्ये आहोत, ही आपल्यात खोलवर असलेली जाणीव इतरांमधेही संस्कार आणि जीवनशैलीतून संक्रमित करण्याची आपली क्षमता ही आपली खरी ओळख आहे.

 

आपल्या देशातील विविध राज्यात असणा-या वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे पोशाख, वेगवेगळ्या आहार पद्धती, असंख्य प्रकारच्या पूजा पद्धती,धर्मसंकल्पना, अगदी वेगळी जीवनशैली हे सारे भिन्न भिन्न असूनही आपली सांस्कृतिक समरसता,परस्परांमधील वैविध्यपूर्ण आचार, विचार,आहार, विहार,भाषा,धर्मश्रद्धेचा आदर करणे,या विविथतेमागील एकतेवर दृढ विश्वास असणे, ही आपली खरी ओळख आहे.

 

रोजच्या सामान्य जीवन व्यवहारातील काय योग्य आणि काय अयोग्य,काय न्याय्य आणि काय अन्याय्य,काय नैतिक आणि काय अनैतिक, काय धर्म आणि काय अधर्म याचा निर्णय घेताना अगदी सहजपणे आपण हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या रामायण आणि महाभारताचे संदर्भ पक्के ध्यानात ठेवतो,ही आपली खरी ओळख आहे.

 

आपण पतित झालो,तरी जे कधीच पतित झाले नाही, असे श्रीराम, श्रीकृष्ण, महर्षी व्यास, वाल्मिकी , तसेच विरक्त जीवन जगणारे साधू संत हेच आम्हाला जीवनादर्श वाटतात,ही आपली खरी ओळख आहे.
अनेक प्रकारच्या विवंचना, दुःख भोगत असताना हे कधी काळी धुकं विरून जाते तसे नाहिसे होईल,हा दृढ विश्वास ही आपली खरी ओळख आहे.

 

अत्यंत सुखात आणि ऐश्वर्यात असतानाही हे ऐहिक सुख ही काही जीवनाची परमावधी नाही,याची स्पष्ट आंतरिक जाणीव, वैराग्य आणि ज्ञानाबद्दलचे अत्यंतिक आकर्षण ही आपली खरी ओळख आहे.आज समाजात आपण सर्वत्र जी अनागोंदी,भ्रष्टाचार पाहतो,कलह आणि संघर्ष पाहतो,ते सारे ईश्वरी कृपेने लुप्त होईलच होईल यावरची अविचल श्रद्धा ही आपली खरी ओळख आहे.

 

 

आम्ही स्खलित होत असलो,जरी अनेक बरी वाईट कर्मे आमच्या हातून मोहवश स्वार्थाच्या प्रभावाने घडत असली, तरी परमेश्वर आम्हाला या दुर्धर वासनांच्या दलदलीतून बाहेर काढेलच,यावरचा विश्वास ही आपली खरी ओळख आहे.

 

भारतातील कोणत्याही अत्यंत भोगलोलूप आणि स्वार्थी मनुष्याच्या मनातही भोगापेक्षा त्यागावर आणि निस्वार्थतेवर असणारा अत्यंतिक विश्वास ही आपली खरी ओळख आहे.भारत ही देवभूमी आहे, ईश्वरी कृपेचा अनुभव भारतातच येवू शकतो,जीवनाची इतिकर्तव्यता इथेच अनुभवता येईल.

 

ऐहिक आणि पारलौकिक जगाची मीलनभूमी हा पवित्र भारतच आहे,कारण या भूमीच्या कणाकणात ईश्वरी अस्तित्वाची स्पंदने प्रत्यक्ष अनुभवता येतात असे अनेक योग्यांनी,साधू संतांनी,दार्शनिकांनी,अवतारी पुरुषांनी सांगितले आहे.

 

ते याच जन्मी अनुभवणे हेच आमच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे, ही क्षणाक्षणाला आम्हाला होणारी आंतरिक जाणीव ही आपली खरी ओळख आहे.अंधार नाहीसा होईल, सूर्य पूर्ण तेजाने तळपेल, आम्हाला आमच्या अंगी सुप्तावस्थेत असलेल्या दिव्यतेचा साक्षात्कार घडेलच घडेल याची मनोमन खात्री, ही आपली खरी ओळख आहे.

 

सोबतचे छायाचित्र हे ब्राझीलच्या पंतप्रधानांनी ट्विट केलेले आहे.भारताने ब्राझीलला कोरोनावरील लस दिल्यानंतर त्यांनी कृतज्ञतेने हे ट्विट केले.त्यात त्यांनी संजीवनी बुटी घेऊन भारतातून ब्राझीलला जाणारे मारुतीराय दाखवले आहेत.

 अभय भंडारी – विटा

Spread the love
error: Content is protected !!