साहित्यिकांनी नेमक्या परिस्थितीचे दर्शन घडवावे
दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनात ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांचे प्रतिपादन
शिरोळ / प्रतिनिधी
राजकारणासाठी धर्माचा वापर होत असून राजकारणाला वैचारिक बैठक राहिलेली नाही.याचा वाईट परिणाम प्रत्येकाच्या घरापर्यंत,चुलीपर्यंत आपण बघतो आहोत. त्यामुळे साहित्यिकांनी नेमक्या परिस्थितीचे दर्शन घडविणे गरजेचे आहे.त्याच पद्धतीने धर्म आणि विज्ञानाची सांगड घालून जगणे आवश्यक आहे.आपला धर्म,जात इतरांना त्रासदायक ठरणार नाही,माणसांमध्ये भिंती उभ्या राहणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी साहित्य संमेलने आवश्यक आहेत, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष, ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांनी केले.
शिरोळ येथील शब्दगंध साहित्य परिषद तर्फे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती नवव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.रामदास फुटाणे पुढे म्हणाले, साहित्यिकांच्या विचारांची बैठक पक्की असेल तर समाज बांधण्याचे मोठे काम साहित्य संमेलने निश्चित करू शकतात.साहित्याच्या जाणीवा प्रगल्भ असाव्यात. यासाठी साहित्यिकांनी प्रथम आपली वैचारिक बैठक आणि भूमिका ठरवावी.जात,धर्म आणि वडिलांच्या पुण्याईवर आता इथून पुढे जगता येणार नाही.यासाठी या समाजातून परिवर्तनाच्या निश्चित दिशा मिळणे आवश्यक आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,राजकारण आणि साहित्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. राजकारणाची गटारगंगा साफ करण्यासाठी सज्जन माणसांनी आणि साहित्यिकांनी पुढे येणे आवश्यक आहे. साहित्यिकांनी काय लिहावे, काय बोलावे हे ठरविणारी नवीन यंत्रणा देशात कार्यरत झाली आहे.यासाठी आपली भूमिका आणि जगण्याची दिशा ठाम राहिली पाहिजे.नव तंत्रज्ञान स्वीकारत असताना आत्मभान विसरत चाललो आहोत. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी साहित्याची नवी पेरणी करणारी साहित्य संमेलने आवश्यक आहेत. साहित्य संमेलनातून समाजाला नवी प्रेरणा आणि दिशा देण्याचे यादव कुटुंबियांचे काम कौतुकास्पद आहे.
संमेलनात संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे आणि मान्यवरांच्या हस्ते ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांना तसेच कै.भाई दिनकरराव यादव ‘जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार’ देऊन महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीपटू कु. अमृता पुजारी (शिरोळ) यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन संजय सुतार आणि प्रा. अनिल कुंभार यांनी केले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री दत्त कारखाना चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला. प्रसाद कुलकर्णी आणि कु. अमृता पुजारी यांनी सत्काराला उत्तर दिले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. वसंत बंडोबा काळे यांच्या 3, कवितासागर प्रकाशनाची 3 पुस्तके तसेच सौ. वर्षाराणी सावंत यांच्या ‘कल्पनेचे पंख’ आणि डॉ. राजश्री पाटील यांच्या ‘आणि चांदणे उन्हात हसले’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आला. डॉ. राजश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झाले. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले.स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मोहन पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. दगडू माने यांनी करून दिला. पद्माराजे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी तर आभार सुनील इनामदार यांनी मानले.
यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, माजी आमदार उल्हासदादा पाटील,श्री दत्तचे व्हा. चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव, रघुनाथ पाटील,इंद्रजीत पाटील,रणजित कदम, शेखर पाटील, संजय पाटील, दरगू गावडे, बाळासाहेब पाटील,कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,शब्दगंध साहित्य परिषदेचे सचिव शंतनू यादव,पृथ्वीराजसिंह यादव,माजी सरपंच गजानन संकपाळ, प्रा. संजय पाटील, नगरसेवक इम्रान अत्तार, राजाराम कोळी, सौ. विदुला यादव, विजय आरगे, निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, अविनाश माने, बाळासाहेब कोळी, धनाजी पाटील नरदेकर, संजयसिंह यादव, संभाजीराव यादव, अरविंदराव यादव, विराजसिंह यादव, विदुला यादव, जोत्स्ना यादव, रणजितसिंह पाटील, सचिन इनामदार, उल्हास पाटील, फिरोज मुजावर, नामदेव भोसले, भगवान कोळी, गोरखनाथ माने, पंडितराव काळे, पोपट पुजारी, रणजितसिंह पाटील, कविता चौगुले, राजाराम काळे, आबासाहेब सुर्यवंशी, डॉ. अरविंद माने, राकेश खोंद्रे, बजरंग काळे, दादासो लवटे, भगवान कोळी, सुभाषसिंह रजपूत, विठ्ठल भाट, महेश कळेकर, धनाजी पाटील नरदेकर, निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, विजय आरगे, संजय चव्हाण, निनाद भोसले, संजय बांदिवडेकर, सुनिल फल्ले, आप्पासो गावडे, चंद्रकांत भाट, विनोद मुळीक, बबन पुजारी, अजित देशमुख, पंडीत पुंदे, प्रफुल्ल कोळी, महादेव शिरोळकर, अवधूत संकपाळ, अन्नपुर्णा कोळी, जयश्री पाटील, बाळासो कोळी, अमर संकपाळ यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.