सदलगा प्रतिनिधी /अण्णासाहेब कदम
सदलगा शहराची कुमारी अंकिता बेडकीहाळे उर्फ बेनाडे हिने 21 व्या वर्षी नोव्हेंबर 2023 या वर्षीच्या राष्ट्रीय स्तरावर असलेली अत्यंत अवघड स्पर्धेची सी ए ची परीक्षा उत्तीर्ण होणारी सदलगा शहरातील पहिली कन्या ठरली.चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील श्री कल्लप्पा बेडकिहाळे हे एका सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या को-ऑपरेटिव बँकेत शिपायी पदावर काम करतात, यांची परिस्थिती अत्यंत बेताची असून चरितार्थासाठी आई शिवणकाम करते,अशा अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत त्यांची कन्या कुमारी अंकिता बेडकीहाळे हिने सर्व परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय स्तरावर नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या सी ए ची ही स्पर्धा परीक्षा वयाच्या 21 व्या वर्षी उत्तीर्ण होणारी सदलगा या शहरातील पहिली कन्या ठरली आहे.या निमित्त सदलगा शहरातील माजी नगरसेवक श्री राजू अमृतसम्मनावर, सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन आणि विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सदलगा शहरातील विठ्ठल रुक्माई मंदिरात कुमारी अंकिता बेडकिहाळे उर्फ बेनाडे हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शहराबाहेर शिक्षण घेऊन स्पर्धेतील अवघड अशी उच्च स्तरावरील सी ए ची परीक्षा उत्तीर्ण होणारी आणि सर्वात लहान वयात या अत्युच्च पदावर पोहचणारी सदलगा शहरातील पहिली कन्या होण्याचा मान तिने पटकावला आहे. त्यामुळे संपूर्ण सदलगा शहर परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या जाहीर सत्काराला उत्तर देताना कुमारी अंकिता हिने आपल्या शैक्षणिक जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना उजाळा दिला विज्ञान शाखेकडे जायचे होते परंतु अति अल्प टक्केवारी कमी पडल्याने नाईलाजाने मला वाणिज्य शाखेकडे वळावे लागले, तरीही मी या क्षेत्रात काहीतरी करून दाखवेन असं पालकांना सांगून तिने या क्षेत्रात उडी घेतली आणि हे यश संपादन केले. या सर्व यशाचे श्रेय माझे सर्व गुरुवर्य माझे माता पिता आणि समाजातील उपेक्षितांचे अंतरंग ओळखणारे समाजसेवक व सेवाभावी संस्था यांना जाते असे तिने यावेळी आवर्जून सांगितले.या सत्कार सोहळ्याप्रसंगी सदलगा शहरातील माजी नगरसेवक राजू अमृतसम्मनावर, आर के फौंडेशनचे कार्यवाह श्री अण्णासाहेब कदम, पत्रकार श्री तात्यासाहेब कदम, श्री कैलास माळगे ,विठ्ठल रखुमाई देवस्थानचे पदाधिकारी श्री अनिल कुलकर्णी,युवा कार्यकर्ते गिरीश अडके, कल्लप्पा बेडकिहाळे,सौ माधुरी जोशी, निलाका माने, मंजिरी वसगडेकर, सुशीला तपकिरे,लीला अमृतसंम्मन्नावर,अरुणा कुलकर्णी,गीता जोशी,मैथिली जोशी,कविता कमते,शैलजा जोशी,संगीता दीक्षित, कलावती शेगळे इत्यादी मान्यवरासह अनेक स्त्रिया पुरुष शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या यशाबद्दल संपूर्ण शहरात अंकिता बेडकीहाळे हिचे कौतुक होत असून तिचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.