शिरोळ / प्रतिनिधी
श्री दत्त भांडारच्या झुणका भाकर केंद्रामध्ये ग्राहकांना शुद्ध,सकस अन्न,चांगल्या मनाने आणि चांगुलपणाने जेवण देण्याचे काम गेली 29 वर्षे अखंडितपणे सुरू आहे. दिवसेंदिवस ग्राहकांचा विश्वास आणि ग्राहकांची संख्या वाढत असून महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त झाला आहे. जे समाजाला चांगले आणि उपयुक्त ते करण्याची श्री दत्त भांडारची दृष्टी असून त्याचा ग्राहकाने फायदा घ्यावा आणि सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात श्री दत्त भांडारच्या झुणका भाकर केंद्रामधील विस्तारीकरण हॉल व स्वतंत्र फॅमिली रूमचे उद्घाटन गणपतराव पाटील (दादा) व मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार सर्वांचे स्वागत करून म्हणाले, विस्तारीकरण म्हणजे संस्थेच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. सहकार वाढला पाहिजे ही स्व. सा. रे. पाटील यांची भूमिका होती. तीच भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्था जोमाने सुरू आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार जे करू शकत नाही ते सहकाराच्या माध्यमातून होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. ग्राहकांनी भांडारच्या विस्तारित सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.प्रा.मोहन पाटील, डॉ.दगडू माने,अंबादास नानिवडेकर यांनी आपल्या मनोगतातून श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सहकारी व सामाजिक उपक्रमांचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्र संचालन दीपक ढोणे यांनी केले तर आभार डॉ. राजश्री पाटील यांनी मानले. विस्तारीकरण हॉलसाठी मदत केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्री दत्त भांडारच्या व्हाईस चेअरमन सौ. अनिता कोळेकर, अनिल पाटील -माणगाव, बाबासाहेब पाटील, नासर पठाण, विजयकुमार गाताडे, जयसिंगपूर उदगाव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, व्हा. चेअरमन आप्पासाहेब नरुटे, जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे, दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संजय पाटील, रघुनाथ पाटील, महेंद्र बागे, सौ. अस्मिता पाटील, रमेश पाटील, महादेव राजमाने, मुसा डांगे यांच्यासह दत्त उद्योग समूहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कर्मचारी व झुणका भाकर केंद्रास भेट देणारे निमंत्रित ग्राहक, मान्यवर तसेच दत्त भांडार मधील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.