कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यात माहे एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ अखेर एकूण १८९ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाले असून त्यांना त्वरित औषधोपचार देण्यात आला आहे.तसेच नवीन शोधलेल्या सर्व कुष्ठरुग्णांच्या कुटुंबातील व रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या सदस्यांना कॅप्सुल रिफाम्पीसीनचा केवळ एक डोस देऊन त्यांना देखील कुष्ठरोगाचा संसर्ग होण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे.त्यामुळे कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपविण्यापेक्षा नजिकच्या शासकीय,निमशासकीय,महानगरपालिका, नगरपालिका दवाखान्यात जावून तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत नागरिकांना केले आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत ३० जानेवारी २०२४ रोजी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२४ राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर करण्यासाठी तसेच कुष्ठरुग्णांशी भेदभाव करणार नाही अशा आशयाचे आवाहनाचे वाचन दि.26 जानेवारी रोजी होणा-या ग्रामसभेत करण्यात येणार आहे.यासह ग्रामसभेत सरपंचांचे भाषण, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारतासाठी प्रयत्न करण्याबाबतची प्रतिज्ञा उपस्थित नागरीकांना देण्यात येणार आहे.
“सपना” या कुष्ठरोगाच्या जनजागृतीकरीता तयार केलेल्या शालेय विद्यार्थीनी आयडॉलने समाजाला द्यावयाच्या संदेशाचे वाचन करण्यात येणार आहे. “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अंतर्गत महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत कुष्ठरोगाची शास्त्रीय माहितीचा समाजामध्ये प्रचार व प्रसार करुन लवकर निदान व लवकर उपचार यांचे महत्व अधोरेखीत करण्यात येणार आहे. कुष्ठरोग हा इतर सर्वसाधारण आजारांसारखाच एक आजार असून तो प्रामुख्याने त्वचा व मज्जेला बाधित करतो. त्वचेवर फिक्कट पांढरा, लालसर, बधीर असलेला चट्टा, ज्यावरील केस गळलेले, घाम येत नसलेला कोरडा असा असतो. तर मज्जा बाधीत असल्यास हाता – पायांमध्ये सतत मुंग्या येणे, हातापायातील शक्ती कमी होणे, हाताला / पायाला बरी न होणारी जखम असणे इ. कुष्ठरोगाची संशयित लक्षणे आहेत. या आजाराची निदानाची सोय सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत केलेली आहे. तसेच निदान निश्चित झाल्यावर त्यावरील बहुविध औषधोपचार (एम.डी.टी) देखील मोफत उपलब्ध आहेत. कुष्ठरोग हा हमखास बरा होणार आजार आहे, अशी माहितीही यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी दिली.कोल्हापूर जिल्ह्यात निदान झालेल्या नवीन 189 रुग्णांमधे 83 असंसर्गिक तर 106 संसर्गिक रुग्ण आहेत. यातील सद्या १६९ सक्रिय आहेत. एकुण 10 हजार लोकसंख्येमागे राज्यातील टक्केवारी 1.31 असून जिल्हा 0.4 टक्के आहे. कोल्हापूर जिल्हयात कुष्ठरोग निर्मूलनाबाबत झालेल्या कामाबाबत जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले. यापुढे जिल्हयातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 100 टक्के योगदान द्या, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले. या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीला जिल्हधिकारी यांचेसह समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड, सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. परवेज पटेल, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक तसेच एनएचएम जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा आशा समन्वयक उपस्थित होते.