नृसिंहवाडी / प्रतिनिधी
येथील कृषीशास्त्रज्ञ डॉ.बाळकृष्ण जमदग्नी यांना पुण्यातील डॉ. आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आजीव सदस्य म्हणून स्वीकृती मिळाली आहे. त्यांचे ५० वर्षांहून अधिक कृषीक्षेत्रातील संशोधनाचे योगदान लक्षात घेऊन संस्थेने ही निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीची ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्यांतर्गत काम करते. संस्थेत मुख्यत्वे जीवशास्त्र विषयक संशोधन केले जाते.
डॉ. जमदग्नी यांनी वनस्पती शरीरक्रियाशास्त्र या विषयात मोठे संशोधन केले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना कडधान्यावर संशोधन करत विविध जाती विकसित केल्या. निवृत्तीनंतर ऊस संजीवनी या पुस्तकात त्यांनी ऊसाच्या जास्तीत उत्पादनासाठीचे तंत्र सांगितले आहे. डॉ. आघारकर संशोधन संस्थेत आजीव सदस्य म्हणून स्वीकृती मिळाल्याने त्यांना सखोल संशोधन व नव्या शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करता येणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. जमदग्नी म्हणाले, “गेल्या काही वर्षात सोयाबीन उत्पादन वाढीसाठी माझे ‘सोया संजीवनी’ हे उत्पादन वाढीचे तंत्र अनेक शेतकऱ्यांनी स्वीकारले आहे. आजमितीस महाराष्ट्रात सोयाबीनचे सुमारे 50 लाख हेक्टर क्षेत्र आहे. डॉ. आघारकर संस्थेतील स्विकृतीमुळे सोया संजीवनी तंत्रज्ञानाचा प्रसार आता व्यापक स्तरावर करणे मला शक्य होईल. वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी जास्त उत्पादनक्षमता असणारे वाण शोधण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत.” दरम्यान निवडीबद्दल विविध स्तरातून डॉ. जमदग्नी यांचे कौतुक होत आहे.