मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारी रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी सकल मराठा समाजाचे बैठक पार पडली.यामध्ये विविध मुद्यांवर चर्चा होऊन, मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा ठराव करण्यात आला.यासह रविवारी कोल्हापुरात महायुतीच्या मेळाव्यात मराठा आरक्षण विषयी हातवर करून घोषणा करावी,असं आव्हान सुद्धा या बैठकीत देण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. २४ डिसेंबर ही राज्य शासनाने दिलेली तारीख पुढं गेल्यानंतर त्यांनी आता मुंबईतील आझाद मैदान याठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या २० जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. या पार्शभूमीवर कोल्हापूर सकल मराठा समाजाची आज बैठक पार पडली. या आंदोलनात सहभागी होण्यासाठीचे करावे लागणारे नियोजन, खाण्यापिण्याचे साहित्य, राहण्याची व्यवस्था अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली. या सगळ्यात मोठ्या संख्येनं मुंबईत धडकण्याचा निर्णय झाल्याची माहिती बाबा इंदुलकर यांनी दिली.येत्या रविवारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाची म्हणजेच महायुतीची बैठक कोल्हापूर मध्ये आयोजित करण्यात आली आहे. जर महायुती नेत्यांना मराठा आरक्षण महत्वाचा प्रश्न वाटतोय, तर या बैठकीत सर्वांनी हात वर करून मराठा आरक्षणची घोषणा करावी असं खुलं आव्हान त्यांनी यावेळी दिलं.या बैठकीस वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, दिलीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, सागर धनवडे, उदय लाड, रुपेश पाटील, गुरुप्रसाद धनवडे यांच्यासह मोठ्या संख्येनं सकल मराठा समाज पदाधिकारी, मराठा बांधव उपस्थित होते.