शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवल्यानंतर पैलवान कु अमृता शशिकांत पुजारी हिने प्रथमच गावी भेट देत शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक व माजी सरपंच अनिलराव यादव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी यादव प्रेमी शिरोळ तालुका व
यादव परिवाराच्या वतीने माजी नगरसेविका विदुलायादव व युवा नेते विराजसिंह यादव यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारी व कुस्ती प्रशिक्षक पै दादासो लवटे यांचा सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्यानंतर शुक्रवारी शिरोळ गावी प्रथमच अमृता पुजारी आल्या होत्या. कुस्ती स्पर्धेतील यशानंतर कु अमृता हिचे 2 महिन्यांनी आगमन होताच यादव परिवाराच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.
यावेळी अनिलराव यादव म्हणाले , पैलवान अमृता पुजारी यांनी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला हे कार्य शिरोळसह महाराष्ट्र राज्याला भूषणावह आहे, यापुढेही कुस्ती क्षेत्रात चमकदार कामगिरी करून भारताचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा देऊन
अनिलराव यादव यांनी शिरोळ येथे येत्या १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भाई दिनकररावजी यादव स्मृति साहित्य संमेलनात पै अमृता पुजारी यांना सन्मानाचा क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे सांगून त्यांनी लोकनेते सदाशिव मंडलिक कुस्ती आखाड्यातील
कुस्ती वस्ताद व प्रशिक्षक यांच्यासह अमृता पुजारी यांनाही साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले.यावेळी कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे ,पै अस्मिता पाटील ,विनोद कागले ,शशिकांत पुजारी,विराजसिंह यादव,पांडुरंग माने , डॉ दगडू माने,बबन पुजारी,दर्शन फडतरे,माणिक पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.