उदगाव कुंजवन महोत्सवात मौजी बंधन संस्कार सोहळा
उदगाव / प्रतिनिधी
उदगाव ता. शिरोळ येथील कुंजवन महोत्सवामध्ये मौजी बंधन (उपनयन संस्कार) शेकडो मुलांच्यावर उत्कृष्ट सिंहनिष्कीडित व्रतकर्ता-साधना महोदधि आचार्यश्री 108 गुरूवर्य प्रसन्न सागरजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये विधीवत करण्यात आले.अंतर्मना आचार्य श्री प्रसन्न सागर जी महाराज यांनी सहभागी प्रत्येक मुलांच्यावर स्वतः संस्कार करत त्यांना व्रत व उपदेश दिले.यागमंडल विधान, गुरूकृपा व्रतसंस्कार महोत्सव मंगळवारी हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.अंतर्मना आचार्य श्री प्रसन्नसागर जी महाराज यांच्यासह ,सौम्यमूर्ती उपाध्याय मुनिश्री पियुष सागर जी महाराज ससंघ सानिध्यात हा महोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी जाप्य,अभिषेक, शांतीधारा,नित्य पूजा याचबरोबर सौभाग्यवती महिला व कुमारिका यांच्याद्वारे गावातून मंगलकुंभ घट यात्रा कुंजवन मध्ये वाजत गाजत आणण्यात येऊन ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते झाले.मौजी बंधन संस्कार विधी मुख्य सभा मंडपात अंतर्मना आचार्य श्रींच्या सानिध्यात व मंत्रोच्चाराने झाला.यावेळी जैन धर्माच्या परंपरेनुसार जीवनाची वाटचाल कशी करावी कोण कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, व्यसनापासून दूर राहावे,शाकाहार हाच सर्वश्रेष्ठ आहार,आई-वडिलांची सेवा,समाजप्रति असलेली जाणीव असा धर्मोपदेश अंतर्मना आचार्य श्री यांनी उपस्थित मुलांना दिला.शेवटी उपस्थितीत मुलांच्या वर मंगलाष्टके म्हणून अक्षतारोपन करण्यात आले.दुपारी नवग्रह शांती हवनास प्रारंभ झाला.त्यानंतर महामंडल आराधना, महायागमंडल विधान आचार्यश्री च्या सानिध्यात संपन्न झाला.सायंकाळी अंतर्मना आचार्य श्री प्रसन्न सागरजी महाराज यांचे प्रवचन,आनंद यात्रा तसेच मंगल आरती करण्यात आली.रात्री सौधर्म इंद्राची सभा, तत्वचर्या,सौधर्मइंद्रांचे आसन कंपायमान,धनपती कुबेरची आज्ञा,कुबेर द्वारा कोषांबी नगराची रचना तसेच रत्नवृष्टी इत्यादी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच महाराज धारणजीद्वारे याचिकांची आशापूर्ती,कुबेरद्वारे अष्टकुमारीकांची सुषमा देवी मातांच्या सेवेमध्ये नियुक्ती करण्यात आली.या धार्मिक सोहळ्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
आकाश जैन,मनीष जैन,प्रदीप जैन, नितेश पाटनी,सनी कासलीवाल,शैलेश पहाड़िया,दर्पण जैन,निमेष जैन तसेच श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर कमिटी ,सन्मति ग्रुप, महिला मंडल यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. याप्रसंगी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.