पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांची श्री दत्त उद्योग समूहास सदिच्छा भेट; आधुनिक साखर निर्मिती प्रक्रिया अन् शेतीपूरक उपक्रमांचे केले कौतुक
शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी कुटुंबीयांसमवेत श्री दत्त उद्योग समूहास सदिच्छा भेट देत कारखान्याच्या कार्यपद्धतीसह आधुनिक साखर निर्मिती प्रक्रिया आणि शेतीपूरक विविध उपक्रमांची माहिती घेतली. उद्योग, शेती, सहकार आणि सामाजिक विकास यांचा सुंदर समन्वय साधत श्री दत्त उद्योग समूहाने उभारलेल्या कार्याचा परिचय घेताना त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. त्यांची ही भेट समूहासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरली.
यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी कारखान्यातील साखर निर्मिती प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. ऊस कारखान्यात दाखल झाल्यापासून त्याचे गाळप, रस प्रक्रिया, साखर निर्मिती आणि अंतिम उत्पादनापर्यंतच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनातील गुणवत्ता आणि कारखान्याची कार्यक्षमता याबाबतही त्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली.
केवळ साखर उद्योगापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी श्री दत्त उद्योग समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही त्यांनी माहिती घेतली. क्षारपड जमीन मुक्ती प्रकल्प,सेंद्रिय कर्ब संवर्धन, ऊस उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न, सुपर केन नर्सरी तसेच शेतीला आधुनिकतेची जोड देणारे विविध प्रयोग याबाबत गणपतराव पाटील यांनी माहिती दिली.जमिनीचा पोत सुधारणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिएकरी ऊस उत्पादन वाढविणे या उद्देशाने राबविण्यात येणारे उपक्रम विशेष लक्षवेधी ठरले.
नीलोत्पल बसू यांचा सकारात्मक दृष्टिकोन, विविध विषयांचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती आणि प्रत्येक गोष्टीकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची कार्यशैली यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. प्रशासकीय जबाबदारीच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढूनपोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांची ही भेट पोलीस प्रशासनातील जबाबदारी सांभाळतानाच शेती, सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.यावेळी पोलीस प्रशासन,शेती,सहकार, उद्योग,ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास अशा विविध विषयांवर मनमोकळी व सकारात्मक चर्चा झाली.