धारकरी आणि वारकरी संप्रदायातून युवकांना राष्ट्रभक्तीची नवी प्रेरणा! शिरोळमध्ये किल्ला स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

Spread the love

धारकरी आणि वारकरी संप्रदायातून युवकांना राष्ट्रभक्तीची नवी प्रेरणा! शिरोळमध्ये किल्ला स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

शिवरायांचा इतिहास, धर्मसंस्कार आणि निर्व्यसनी जीवनाचा संदेश; शिरोळमध्ये किल्ला स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

शिरोळ / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा देदीप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच युवकांनी निर्व्यसनी राहून राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी शिवरायांचे धारकरी आणि वारकरी संप्रदाय हे दोन महत्त्वाचे प्रेरणादायी मार्ग आहेत.या दोन्ही परंपरांमधील विचार आणि संस्कार युवकांमध्ये रुजल्यास राष्ट्रभक्त, चारित्र्यसंपन्न आणि सक्षम पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते उदय आडके-मोरे यांनी केले.

येथील श्री बुवाफन महाराज उत्सव आणि हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त शिवप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. येथील छत्रपती शिवाजी महाराज तक्त येथे माजी नगरसेवक दयानंद जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात उदय मोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ अभियंता शिवराज ठोंबरे होते.

शिरोळच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमातून बालवयातच मुलांच्या मनात गड-किल्ल्यांविषयी अभिमान,आत्मीयता आणि इतिहासाची ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केवळ मातीचे किल्ले उभारणे हा या स्पर्धेचा उद्देश नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा इतिहास,गडकोटांचे सामरिक महत्त्व आणि मावळ्यांच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला व्हावी, हा या आयोजनामागील मुख्य हेतू आहे.

शहरातील मुलांनी आकर्षक आणि ऐतिहासिक संदर्भ जपणारे किल्ले तयार करावेत, त्यासाठी इतिहासाची पुस्तके वाचावीत, गड-किल्ल्यांची माहिती मिळवावी आणि शिवरायांचे विचार आचरणात आणावेत,असे आवाहन यावेळी करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आचार-विचारांचा वारसा जपणारी तरुण पिढी घडविण्याच्या उद्देशाने शिरोळमध्ये प्रथमच शिवप्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकास ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये रोख पारितोषिकासह कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे बालचमूंमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सी.जी.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.बाळासाहेब माळी यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेचा उद्देश आणि आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.बजरंग काळे आणि राहुल कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, खंडेराव जगदाळे, स्वप्निल ढेरे, भरत आवळे, चंद्रकांत भाट, आशुतोष माळी, नगरसेवक दीपक भाट, ओमकार सोनार, ऋषिकेश कुंभार, कृष्णा देशमुख, सूरज कांबळे, अमरसिंह शिंदे, प्रकाश माळी, भूषण गंगावणे, शक्तीजीत उर्फ चिकू गुरव, पोपट गावडे, अभिजीत जाधव, दिलीप चुडमुंगे, प्रवीणसिंह चुडमंगे, विजय हेगाण्णा, आप्पा हेरवाडे, श्रीनिवास रिसवडे, बबलू मरळे, सागर पाटील, शरद चुडमुंगे, सर्जेराव कांबळे यांच्यासह शिवप्रेमी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!