शिरोळमध्ये शिवप्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवरायांना अभ्यंगस्नान; सामूहिक आरतीने दीपावलीचा उत्साह महामानवांच्या पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन; शिवभक्तांकडून जयघोष
शिरोळ / प्रतिनिधी
दीपावली सणाचे औचित्य साधून शिरोळ येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभ्यंगस्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले. सामूहिक आरती आणि प्रेरणा मंत्राच्या घोषणांनी पंचायत समितीचा परिसर शिवमय झाला.पारंपरिक धार्मिक विधी आणि शिवभक्तीच्या उत्साहातून दीपावलीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
शिवप्रतिष्ठानच्या वतीने रविवारी पहाटे शिरोळ पंचायत समितीच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह परिसरातील विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार चंद्रकांत भाट आणि संजयसिंह ऊर्फ संभाजी चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित शिवभक्तांनी सामूहिक आरती केली. यावेळी प्रेरणा मंत्राचे पठण करण्यात आले. तसेच पंचायत समितीच्या आवारातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण, त्यांचे विचार आणि राष्ट्रपुरुषांचा आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात झालेल्या या धार्मिक आणि प्रेरणादायी उपक्रमाला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, शिरोळ तालुकाध्यक्ष प्रवीण चुडमुंगे, पत्रकार दिलीप कोळी (दिवाण), मानसिंग राजपूत, दीपक माने, देवदत्त कुलकर्णी, सुखदेव खडके, गुरुदत्त देसाई, विक्रम चुडमुंगे, अजित देशमुख, धीरज शिंदे, संकेत माने, श्रेयश लेले, मयूर माने, चिमासाहेब पाटील, अभिजीत जाधव, शिवतेज चुडमुंगे, अभिषेक कदम, अभय कांबळे, नितीन कोळी, वित्रराग उगारे, संदीप कोरवी, श्रीकांत पाटील, रोहित आरगे, सुयेश लाटे, स्वप्निल लाटे, अभिषेक पाटील, महेश गंगधर, श्रेयश लुगडे यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.