शिरोळ शहरात भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन उत्साहात संपन्न बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी; घराघरांत सुख-समृद्धीसाठी महालक्ष्मीची मनोभावे प्रार्थना

Spread the love

शिरोळ शहरात भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन उत्साहात संपन्न

बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी; घराघरांत सुख-समृद्धीसाठी महालक्ष्मीची मनोभावे प्रार्थना

शिरोळ / प्रतिनिधी

दीपावलीच्या मंगलमय पर्वातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा असलेल्या श्री लक्ष्मीपूजनाचा उत्सव शिरोळ शहर व परिसरात रविवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. धन, ऐश्वर्य, सुख-समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मीचे पूजन करून नागरिकांनी कुटुंबाच्या सुख-समाधानासाठी तसेच व्यापार-उद्योगाच्या भरभराटीसाठी देवीचरणी प्रार्थना केली. सर्वत्र मंगलमय वातावरण आणि दीपोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.

लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पहाटेपासूनच शहरात लगबग सुरू झाली होती. घरांची स्वच्छता, आकर्षक रांगोळ्या, विद्युत रोषणाई, पूजेची तयारी आणि पूजासाहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. श्री महालक्ष्मीचा फोटो, केरसुणी, फळे, पानसुपारी, रांगोळी, ऊस, केळीची खुट, मिठाई, पूजेचे साहित्य आणि फटाके खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

शिरोळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आणि प्रमुख बाजारपेठेच्या परिसरात दिवसभर खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ होती. विविध वस्तूंनी सजलेली दुकाने, फुलांची आकर्षक मांडणी आणि ग्राहकांची गर्दी यामुळे बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सणाच्या निमित्ताने व्यापाऱ्यांमध्येही विशेष उत्साह दिसून आला.

सायंकाळी शुभमुहूर्तावर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये विधिवत लक्ष्मीपूजन करून व्यवसायाच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली. घरोघरी कुटुंबीयांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. तसेच विविध सार्वजनिक कार्यालयांमध्येही धार्मिक विधींनुसार पूजन करण्यात आले.

शिरोळ नगरपरिषद कार्यालयात नगरसेविका अनुराधा गुरव व सामाजिक कार्यकर्ते शक्तिजीत ऊर्फ चिकू गुरव यांच्या हस्ते श्री लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती विजय आरगे, पालिकेचे कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दीपावलीच्या आनंदोत्सवात श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शहर व परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!