गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदासाठी आडनाईक, पाटील, हेंद्रे, पाटोळे यांची वर्णी लागण्याची शक्यता

Spread the love

गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदासाठी आडनाईक, पाटील, हेंद्रे, पाटोळे यांची वर्णी लागण्याची शक्यता; चार तज्ज्ञांची नावे चर्चेत; लवकरच अधिकृत घोषणा

राजकीय नावांना तूर्तास बाजूला ठेवल्याची चर्चा

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकपदासाठी चार तज्ज्ञांची नावे चर्चेत आली असून, बँकिंग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी शिवाजीराव आडनाईक (यवलूज), सनदी लेखापाल के. डी. पाटील (केनवडे), डॉ. प्रवीण हेंद्रे (कोल्हापूर) आणि ॲड. प्रकाश पाटोळे (सांगली) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असून, सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांचेही नाव शासकीय संचालक म्हणून निश्चित झाल्याचे समजते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

गोकुळमधील शासन नियुक्त्यांवरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, राजकीय नेत्यांना संधी देण्याऐवजी सहकार, बँकिंग, लेखा आणि कायदा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देण्याची रणनीती महायुतीने आखल्याची चर्चा आहे. शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयाला जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून विरोध होत असल्याने महायुतीने सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाने ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारासह चार शासन नियुक्त संचालक नेमण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे अध्यादेशात रूपांतर झाले. मात्र, या निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता असल्याने नियुक्त्यांबाबत कायदेशीर खबरदारी घेतली जात असल्याचे चित्र आहे.

राजकीय नावांना तूर्तास ब्रेक!

यापूर्वी शासन नियुक्त संचालकपदासाठी नवीद मुश्रीफ, शौमिका महाडिक, बाळासाहेब खाडे आणि अशोक फराकटे यांची नावे चर्चेत होती. मात्र, अध्यादेशाचे न्यायालयीन भवितव्य अनिश्चित असल्याने राजकीय नावांऐवजी तज्ज्ञ व्यक्तींना संधी देण्याचा पर्याय पुढे आल्याचे समजते. अंतिम नियुक्त्यांची अधिकृत घोषणा कधी होते आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!