शिरोळच्या उल्हास पाटील यांच्याकडून वृद्धांना मायेचा आधार!दीपावलीनिमित्त आई वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांना नवीन कपड्यांची भेट; सामाजिक बांधिलकीचे दर्शन

Spread the love

शिरोळच्या उल्हास पाटील यांच्याकडून वृद्धांना मायेचा आधार!दीपावलीनिमित्त आई वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांना नवीन कपड्यांची भेट; सामाजिक बांधिलकीचे दर्शन

शिरोळ / प्रतिनिधी

सण-उत्सवांचा आनंद हा केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि निराधार घटकांपर्यंत पोहोचविण्याची सामाजिक बांधिलकी शिरोळ येथील युवा सामाजिक कार्यकर्ते उल्हास उत्तमराव पाटील यांनी जपली आहे. दीपावलीच्या निमित्ताने त्यांनी निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांना नवीन कपडे भेट देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. त्यांच्या या उपक्रमातून माणुसकी आणि सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.

आई वृद्धाश्रमाचे संस्थापक संजय भोसले यांनी आश्रमातील वृद्ध महिलांना दीपावलीनिमित्त नवीन साड्या व कपड्यांची व्यवस्था केली होती. मात्र, आश्रमातील वृद्ध पुरुषांना नवीन कपडे मिळाले नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. प्रत्येकाला सणाचा आनंद घेता यावा, या भावनेतून त्यांनी शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भाट यांच्याशी याबाबत चर्चा केली.

चंद्रकांत भाट यांनी ही परिस्थिती उल्हास पाटील यांच्या कानावर घातली. वृद्धांच्या दिवाळीत कपड्यांअभावी आनंद कमी पडू नये, या भावनेतून उल्हास पाटील यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक असलेले नवीन कपडे खरेदी केले. त्यानंतर स्वतः आई वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना कपड्यांचे वाटप केले. तसेच भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

वृद्धापकाळात माणसाला पैशांपेक्षा प्रेमाचे दोन शब्द, आपुलकीची वागणूक आणि मायेचा आधार अधिक महत्त्वाचा असतो. कुटुंबापासून दूर असलेल्या निराधार वृद्धांच्या जीवनात सणासुदीच्या काळात आनंद निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न असला, तरी त्यातून सामाजिक उत्तरदायित्वाची मोठी जाणीव अधोरेखित झाली.

यावेळी आई वृद्धाश्रमाचे संस्थापक संजय भोसले, चंद्रकांत भाट, सर्जेराव कांबळे, आराध्या पाटील, ज्योतिरादित्य पाटील यांच्यासह वृद्धाश्रमातील निराधार वृद्ध उपस्थित होते. उल्हास पाटील यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!