माऊलीच्या हक्काच्या सादेला राजू शेट्टींचा धावता दौरा थांबला! अंजनीत आबांच्या आईंची घेतली भेट; जुन्या आठवणींनी शेट्टी भावुक, तीस वर्षांच्या ऋणानुबंधांना उजाळा

Spread the love

माऊलीच्या हक्काच्या सादेला राजू शेट्टींचा धावता दौरा थांबला!

अंजनीत आबांच्या आईंची घेतली भेट; जुन्या आठवणींनी शेट्टी भावुक, तीस वर्षांच्या ऋणानुबंधांना उजाळा

अंजनी / प्रतिनिधी

राजकारणातील धावपळ, सभा, आंदोलने आणि दौरे यापलीकडे माणसाला जोडणारी नाती किती अनमोल असतात, याचा प्रत्यय माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अंजनी येथील एका कौटुंबिक भेटीतून आला. सोलापूर जिल्ह्याचा दौरा आटोपून कोल्हापूरकडे परतत असताना एका माऊलीने दिलेली हक्काची साद आणि स्वर्गीय माजी मंत्री आर. आर. ऊर्फ आबा पाटील यांच्या आठवणींनी राजू शेट्टी यांचा प्रवास थेट तासगाव तालुक्यातील अंजनी गावाकडे वळला. आबांच्या आईंनी दिवाळीच्या फराळासाठी केलेला प्रेमळ आग्रह शेट्टी यांनी मनापासून जपत त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि तीस वर्षांच्या मैत्रीतील जिव्हाळ्याचे क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले.

या भेटीमागील आठवण सांगताना राजू शेट्टी म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच आबांचे लहान बंधू तथा निवृत्त पोलीस अधिकारी आर. आर. पाटील (तात्या) यांनी फोनवरून आईंशी संवाद घडवून आणला होता. त्यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा देताना आईंनी अत्यंत हक्काने, मायेने आणि आपुलकीने, “राजू, काहीही कर; पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीला यायचंच!” असा आग्रह केला. माऊलीच्या या प्रेमळ शब्दांमध्ये असलेली आपुलकी पाहता तो शब्द मोडणे शक्यच नव्हते. त्यामुळे सोलापूरचा दौरा संपवून परतताना त्यांनी अंजनी गाठत आईंची भेट घेतली.

यावेळी आबांच्या कुटुंबीयांसमवेत त्यांनी कौटुंबिक गप्पा मारल्या. आईंसोबत बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या साध्या राहणीमानाचा, लोकांशी असलेल्या आपुलकीच्या संबंधांचा आणि त्यांच्या हसऱ्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख होताच वातावरण भावुक झाले. आबांच्या आठवणी निघताच आईंचे डोळे पाणावले. मुलाच्या आठवणींनी त्यांचे मन भरून आले. मात्र, या भावनिक क्षणी आईंच्या मायेचा हात आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद राजू शेट्टी यांच्यासाठी मनाला उभारी देणारे ठरले.

या भेटीतील आणखी एक विशेष बाब म्हणजे आबांच्या आईंचा उत्साह आणि साधेपणा. वयाची मर्यादा ओलांडली असतानाही त्या आजही दररोज सकाळी रानात जातात. घरातील जुन्या रितीरिवाजांचे आणि परंपरांचे पालन त्या तितक्याच निष्ठेने करतात. त्यांच्या जीवनशैलीतून ग्रामीण संस्कृतीची मुळे आणि कष्टाची परंपरा आजही जिवंत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या स्वभावाचे राजू शेट्टी यांनी विशेष कौतुक केले.

आर. आर. तात्या आणि आपली गेल्या तीस वर्षांपासून मैत्री असल्याचे सांगताना शेट्टी यांनी त्यांच्या स्वभावातील साधेपणाचा आवर्जून उल्लेख केला. तीस वर्षांपूर्वीची पहिली भेट आणि आजचा दिवस यामध्ये तात्यांच्या स्वभावात कोणताही बदल झालेला नाही. पद, प्रतिष्ठा किंवा अधिकार यांचा कधीही बडेजाव न करता माणुसकीचे नाते जपणारा हा मित्र असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अंजनी येथील या घरात जेव्हा जेव्हा पाऊल पडते, तेव्हा आबांचा हसरा चेहरा, त्यांचा साधेपणा आणि जुन्या ऋणानुबंधांच्या आठवणी मनात जाग्या होतात, असेही शेट्टी यांनी सांगितले.

सार्वजनिक जीवनात संघर्ष, आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीची धावपळ सुरूच असते. मात्र, अशा कौटुंबिक भेटींमधून मिळणारी मायेची ऊब आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद मनाला नवी ऊर्जा देतात. एका माऊलीने केलेल्या हक्काच्या आग्रहाला प्रतिसाद देत राजू शेट्टी यांनी जपलेले हे नाते केवळ दिवाळीच्या फराळापुरते मर्यादित राहिले नाही; तर मैत्री, माणुसकी आणि जुन्या ऋणानुबंधांची जपणूक अधोरेखित करणारा हा भावनिक क्षण ठरला.

Leave a Comment

error: Content is protected !!