ऊस आंदोलनाचा भडका! हेरवाड, नांदणीत ऊस वाहने पेटवली; टायर फोडून वाहतूक रोखली ; दराचा तोडगा मान्य नसल्याने शेतकरी आक्रमक

Spread the love

ऊस आंदोलनाचा भडका! हेरवाड, नांदणीत ऊस वाहने पेटवली; टायर फोडून वाहतूक रोखली; दराचा तोडगा मान्य नसल्याने शेतकरी आक्रमक; जवाहर, पंचगंगा कारखान्यांकडे जाणारी वाहने लक्ष्य, दोन दिवसांपासून कारखान्यांचे गाळप ठप्प

शिरोळ | प्रतिनिधी 

ऊसदराच्या प्रश्नावरून शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा रविवारी रात्री भडका उडाला. हेरवाड आणि नांदणी परिसरात कारखान्यांकडे ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांना आग लावण्यात आल्याची घटना घडली. तसेच अनेक वाहनांचे टायर फोडून ऊस वाहतूक रोखण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली असून ऊसदर आंदोलनाला आता आक्रमक वळण मिळाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा तोडगा निघाल्यानंतरही शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा तोडगा अमान्य केला आहे. वाढीव दर मिळाल्याशिवाय ऊस तोडणी करू द्यायची नाही, अशी भूमिका घेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोडी नाकारल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील इतर भागांत गाळप हंगाम सुरू होण्याची चिन्हे असताना शिरोळ तालुक्यात मात्र आंदोलनाची धग कायम आहे.

दरम्यान, काही कारखान्यांनी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांकडून बळजबरीने ऊसतोडणी करून घेतल्याचा आरोप होत आहे. अशा ऊसतोडी आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या होत्या. मात्र, रात्रीच्या सुमारास काही ऊस वाहने भरून जवाहर आणि पंचगंगा साखर कारखान्यांकडे जात असताना हेरवाड व नांदणी येथे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे समजते. काही वाहनांना आग लावण्यात आली, तर अनेक वाहनांचे टायर फोडण्यात आले. या प्रकारामुळे ऊस वाहतूकदार आणि कारखाना व्यवस्थापनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

विशेष म्हणजे, ऊसदराचा तोडगा निघून दोन दिवस उलटले तरी शिरोळ तालुक्यातील कारखान्यांचे गाळप अद्याप सुरू झालेले नाही. आंदोलन अंकुश संघटनेने आपले वाढीव दराचे आंदोलन मागे घेतलेले नाही. दुसरीकडे शेतकरीही ऊसतोडणीसाठी सहकार्य करण्यास तयार नसल्याने कारखान्यांची कोंडी झाली आहे.

ऊसदराच्या संघर्षाने आता केवळ कारखान्यांचे गाळपच नव्हे, तर ऊस वाहतुकीचाही प्रश्न गंभीर बनला आहे. हेरवाड आणि नांदणीतील वाहन जाळपोळीच्या घटनेमुळे आंदोलनाची दिशा अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरासाठी सुरू झालेला हा संघर्ष आता कोणते वळण घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!