शिरोळच्या विकासात पालिका कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे ; उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांचे गौरवोद्गार;

Spread the love

शिरोळच्या विकासात पालिका कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे!

कर्मचाऱ्यांच्या कष्टातून शहराची प्रगती; १४ लाखांचे सानुग्रह अनुदान खात्यावर जमा, दीपावली भेटवस्तूंचेही वाटप

उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांचे गौरवोद्गार; कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक

शिरोळ / प्रतिनिधी

शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये नगरपरिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यापासून शहराची स्वच्छता, आरोग्य व्यवस्था आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यापर्यंत कर्मचारी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि पालिका पदाधिकाऱ्यांचे नियोजन यांच्या समन्वयातून शिरोळ शहराची विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या काळात शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने आणि तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी व्यक्त केला.

शिरोळ नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि दीपावली भेटवस्तू वितरण सोहळ्यात ते बोलत होते. प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात युवा नगरसेवक ओंकार गावडे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना दीपावली भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी पालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एकूण १४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वर्ग करण्यात आले.

यावेळी यादव म्हणाले, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची भूमिका ही केवळ प्रशासकीय कामकाजापुरती मर्यादित नसून शहराच्या विकास प्रक्रियेत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. घनकचरा व्यवस्थापन, नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधा तसेच पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सेवांची जबाबदारी कर्मचारी सक्षमपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कष्टामुळेच नागरिकांना चांगल्या सुविधा देणे शक्य होत आहे.

शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात समन्वय व सहकार्य असणे आवश्यक आहे. शिरोळच्या नागरिकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पालिकेतील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक प्रयत्नशील आहेत. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील रखडलेले प्रश्न मार्गी लावून विकासकामांना अधिक गती दिली जाईल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सानुग्रह अनुदान आणि दीपावली भेटवस्तू देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सणासुदीच्या काळात पालिकेने कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा सन्मान केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या जयश्री पाटील आणि नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप चुडमुंगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी सरपंच गजानन संकपाळ, नगरसेविका कल्पना काळे, रेखाताई कोरे, अनुराधा गुरव, श्वेता जाधव, नगरसेवक दीपक भाट, विजय आरगे, निलेश गावडे, राहुल कोळी, माजी नगरसेवक पंडित काळे, विठ्ठल पाटील, बबन पुजारी, चंद्रकांत भाट, राजेंद्र कांबळे, विवेक फल्ले, अरुण कांबळे, बाळासाहेब कोरे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!