सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १५ हजारांची लाच मागणी; १२ हजार स्वीकारताना खासगी इसम रंगेहात जाळ्यात!

Spread the love

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १५ हजारांची लाच मागणी; १२ हजार स्वीकारताना खासगी इसम रंगेहात जाळ्यात!

नागावमधील तलाठी कार्यालयाशी संबंधित लाचखोरीचा प्रकार; दोन खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र दुरुस्ती करून नावाची नोंद करण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार नागाव (ता. हातकणंगले) येथे उघडकीस आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोल्हापूर पथकाने सापळा रचून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसम सुरज कुंतीनाथ सोळांकुरे (वय ४२, रा. शिवाजी चौक, नागाव) याला रंगेहात पकडले. या प्रकरणात अवधूत रामचंद्र लोंढे (वय ३७, रा. नागाव) या अन्य खासगी व्यक्तीचाही सहभाग समोर आला असून, दोघांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची नागाव येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या गटामध्ये क्षेत्राची चुकीची नोंद झाल्याने ती दुरुस्त करून सातबारा उताऱ्यावर योग्य क्षेत्र नोंदवावे, तसेच संबंधित सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव लावावे, यासाठी त्यांनी हातकणंगले तहसील कार्यालयात अर्ज केला होता. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण नागाव तलाठी कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रेही कार्यालयात सादर केली होती.

कामाच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता तलाठी यांनी तक्रारदाराला कार्यालयातील खासगी उमेदवार अवधूत लोंढे यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर लोंढे यांनी संबंधित काम करून देण्यासाठी तलाठी मॅडम यांच्याकडून १५ हजार रुपयांची मागणी असल्याचे सांगून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.

या प्रकारामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. विभागाने केलेल्या पडताळणीत अवधूत लोंढे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रकरणात सुरज सोळांकुरे यानेही तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी मध्यस्थी करत तडजोडीअंती १२ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताच सुरज सोळांकुरे याला पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे नागाव परिसरातील महसूल कार्यालयाशी संबंधित कामकाजातील कथित लाचखोरीचा प्रकार चर्चेत आला आहे.

या प्रकरणी अवधूत रामचंद्र लोंढे आणि सुरज कुंतीनाथ सोळांकुरे यांना ताब्यात घेण्यात आले असून, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर यांच्या नेतृत्वाखाली, पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास माने, सचिन पाटील, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल संगिता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, वैभव खोत आणि प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

error: Content is protected !!