शिरोळमध्ये दीपावलीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धा; शिवशौर्याचा जागर घडविण्याचा उपक्रम ; शिवचरित्र आणि गडकोटांच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा उद्देश

Spread the love

शिरोळमध्ये दीपावलीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धा; शिवशौर्याचा जागर घडविण्याचा उपक्रम ; शिवचरित्र आणि गडकोटांच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा उद्देश

शिरोळ / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा इतिहास, गडकोटांचे महत्त्व आणि मराठी मातीतील शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिरोळ येथे दीपावलीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बुवाफन महाराज उत्सव, हजरत नूरखान बादशाह उरूस समिती आणि शिवप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळच्या इतिहासात प्रथमच अशा भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे शहरात शिवशौर्याचा जागर घडणार आहे.

श्री गणेश चौक मित्र मंडळ व उरूस समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. दीपावलीच्या सुट्टीत मुलांनी केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून घ्यावी, गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारताना त्यांचा इतिहास, बांधकाम पद्धती आणि स्वराज्याच्या लढाया यांचा अभ्यास करावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आचार-विचारांचा वारसा जपणारी तरुण पिढी घडावी, मुलांमध्ये ऐतिहासिक जाणिवा, कल्पकता आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. किल्ले उभारताना शिवचरित्र आणि गडकोटांच्या इतिहासाची पुस्तके वाचून माहिती मिळविण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार असून, विजेत्यांना कायमस्वरूपी सन्मानचिन्ह (शील्ड) देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तक्त्याजवळ होणार आहे. माजी नगरसेवक दयानंद जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, शिवराय ठोंबरे अध्यक्षस्थानी असतील. नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, उदय मोरे, पोपट गावडे, प्रवीणसिंह चुडमुंगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या ऐतिहासिक उपक्रमात जास्तीत जास्त मुलांनी आणि तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुक स्पर्धकांनी अभिजीत जाधव, शिवतेज चुडमुगे आणि सी. जी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!