नागाव परिसरात बिबट्याचा वावर निश्चित मात्र अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Spread the love

नागाव परिसरात बिबट्याचा वावर निश्चित मात्र अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

नागाव परिसरात शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, तिथे बिबट्याचे पाऊलखुणा (ठसे) आढळल्याने हा बिबट्याच असल्याचे सांगितले . दरम्यान, हाच बिबट्या इतर गावांतही फिरत असल्याच्या अफवांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

नागाव ता हातकणंगले येथे शनिवारी रात्री राहुल लंबे आणि अशोक सोळांकुरे हे दोघे नागाव फाट्यावरून नागाव गावाकडे मोटारसायकलवरून जात असताना

यादरम्यान त्यांच्या मोटारसायकलच्या समोरून रस्त्यावरून झेप घेत एक बिबट्या उसाच्या शेतात गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ गावकामगार पोलीस पाटील बाबुसो पाटील, शिरोली पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राण्याच्या हालचाली, शरीरयष्टी आणि पाऊलखुणांची कसून तपासणी केली. तो बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले पण हा बिबट्या उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्गस्थ झाल्याचे राहूल लंबे यानी वन अधिकार्यांना सांगितले

नागावमध्ये बिबट्या दिसल्याच्या घटनेनंतर शिरोली पुलाची, यादववाडी, हालोंडी आणि टोप या परिसरातही बिबट्या मुक्त संचार करत असल्याच्या अफवा काही लोकांकडून पसरवण्यात आल्या. यामुळे गावातील नागरिकांनी नेतेमंडळीसह आणि शासकीय यंत्रणेला रात्रभर कसरत करावी लागली. वन विभागाने सोमवारी रात्री उशिरा यादववाडी आणि हालोंडी परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली मात्र ड्रोन कॅमेऱ्यात कोणत्याही हालचाली किंवा पायाचे नवे ठसे आढळले नाहीत. परिसरात बिबट्याचा वावर असता, तर अनहोनी घटना घडली असती परंतु अशी कोणतीही घटना घडलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण अफवा पसरवू नयेत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नागाव , शिरोली पुलाची, टोप , हालोंडीसह गावांमध्ये बिबट्या आला रे आला’ अशा अफवा पसरवून भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. नागरिकांनी जागरूक राहावे, परंतु कोणत्याही तोंडी माहिती किंवा उलटसुलट अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करावी. विनाकारण दिशाभूल करून भीती पसरवू नये, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!