स्वाभिमानीचा दणका! कर्नाटकातून दिल्लीला जाणारी साखर कुरुंदवाडमध्ये रोखली ; ३० टनांहून अधिक साखरेचा ट्रक ताब्यात

Spread the love

स्वाभिमानीचा दणका! कर्नाटकातून दिल्लीला जाणारी साखर कुरुंदवाडमध्ये रोखली

३० टनांहून अधिक साखरेचा ट्रक ताब्यात; साखर वाटपाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, ऊसदराचा तिढा चिघळला!

कुरुंदवाड | प्रतिनिधी

ऊसदराचा तिढा कायम असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी साखरेच्या वाहतुकीवर थेट हल्लाबोल केला. कर्नाटकातील साखर कारखान्यातून मिरजमार्गे दिल्लीला निघालेला ३० टनांहून अधिक साखर वाहून नेणारा ट्रक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड येथे रोखला. ट्रकमधील साखर शेतकऱ्यांना वाटण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा प्रयत्न रोखला आणि संबंधित ट्रक ताब्यात घेतला. ऊसदराचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेमुळे साखर वाहतुकीवरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

कर्नाटकातील एका साखर कारखान्यातून साखरेची पोती घेऊन निघालेला हा ट्रक मिरज रेल्वे स्थानकाकडे जात होता. तेथून रेल्वेने साखर दिल्लीला पाठवली जाणार होती. या वाहतुकीची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाच मैल परिसरापासून ट्रकचा पाठलाग केला. कुरुंदवाड येथे ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये साखरेची पोती असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ट्रकच्या चाव्या काढून घेतल्या. ट्रकमधील साखर शेतकऱ्यांना वाटण्याचा निर्णय घेत पोती खाली उतरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना ट्रकमधून खाली उतरवले. त्यानंतर ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना केला.

 ‘ऊसदर ठरेपर्यंत साखरेचा एक कणही बाहेर जाऊ देणार नाही!’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत ऊसतोडणी होऊ देऊ नका, तसेच साखर कारखान्यांतून साखरेची वाहतूक रोखा, असे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी साखरेचा ट्रक रोखल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित ऊसदर मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचा इशाराही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात विशाल चौगुले, बंडू पाटील, विक्रम पाटील, बंडू उमडाळे, सचिन शिंदे, वर्धमान भबीरे, शिवाजी रोडे, प्रमोद चौगुले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ऊसदरावर तोडगा निघत नसल्याने शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा कायम असून, साखर वाहतूक रोखण्याच्या या घटनेमुळे आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. आता ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणा काय भूमिका घेते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!