पुलाची शिरोली येथे घनकचरा व मैला गाळ प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथील ५४ एकर गायरान जागेत मंजूर झालेल्या घनकचरा आणि मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ.पद्मजा करपे या होत्या, तर प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य सौ. कमल कौंदाडे आणि ग्रामविकास अधिकारी सौ. गीता कोळी यांची होती.

पुलाची शिरोली गावासह या प्रकल्पासाठी शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प २७ लाख रुपये मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प २ कोटी ३८ लाख रुपये निधी मंजूर झाला असून तो ग्रामपंचायतीकडे वर्गही करण्यात आला आहे .

निधी उपलब्ध असूनही जागा न मिळाल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. ग्रामपंचायतीने या प्रकल्पासाठी गावातील ५४ एकर गायरान जमिनीतून ५ गुंठे जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतर सोमवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन ठरले होते. त्यानुसार भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या जागेला कडाडून विरोध केला, ज्यामुळे उद्घाटन कार्यक्रम थांबवावा लागला.

यावरून सत्ताधारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली आणि दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारची गंभीर दखल घेत तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि जागा निश्चित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, महसूल प्रशासनाच्या निर्देशानंतर अखेर ठरलेल्या जागेवरच आज या प्रकल्पाचे भूमिपूजन यशस्वीरीत्या पार पडले.

शिरोली गावातील या गायरान जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती आणि वीटभट्टी व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे ही जागा आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली असून स्थानिकांचा त्याला विरोध होता. मात्र, तहसीलदार व प्रशासनाच्या उपस्थितीमुळे हा वाद मिटवून आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला.

यावेळी उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील , माजी उपसरपंच कृष्णात करपे , बाजीराव पाटील , महंमद महात , महादेव सुतार , आरिफ सर्जेखान , श्रीकांत कांबळे , दिपक यादव , योगेश खवरे , संदिप तानवडे , प्रशांत कागले,डॉ.सुभाष पाटील, बाळासाहेब पाटील,धिरज पाटील आदिसह उपस्थित होते

Leave a Comment

error: Content is protected !!