संघर्षातून फुललेला कलावंत : श्री गणेश मूर्ती घडविणारा आणि सजविणारा निळकंठ गावडे

Spread the love

शिरोळ | प्रतिनिधी

कला ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती जीवनाला दिशा देणारी शक्ती असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिरोळ नगरीतील श्री हनुमान तालीम मंडळाचे कार्यतत्पर सदस्य आणि उत्कृष्ट चित्रकार, शिल्पकार तसेच गणेशमूर्तीकार निळकंठ गावडे. बालवयापासून चित्रकला, शिल्पकला आणि गणेशोत्सवातील देखावे उभारण्याची आवड त्यांनी सातत्याने जोपासली. आज त्याच कलेच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या कलाकृतींना भाविकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

निसर्गातील प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्ट, माणसांचे भावविश्व आणि वास्तव जीवनातील विविध छटा आपल्या डोळ्यांत व मनात साठवून त्या कोऱ्या कागदावर जिवंत करण्याचे विलक्षण कौशल्य निळकंठ गावडे यांच्याकडे आहे. चित्रकलेतून रंगांची उधळण करताना ते ज्या संवेदनशीलतेने भावविश्व व्यक्त करतात, त्याच संवेदनशीलतेने ते गणेशमूर्ती घडवितात.

गणेशमूर्ती तयार करणे ही केवळ कारागिरी नसून ती भक्ती, संयम आणि साधनेची प्रक्रिया असल्याचे त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून जाणवते. विशेषतः श्री गणेशाच्या डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावर भावपूर्ण जिवंतपणा आणण्याची त्यांची हातोटी ही त्यांच्या कलेची खरी ओळख ठरली आहे. मूर्तीची प्रमाणबद्ध बांधणी, आकर्षक रचना, बारकावे आणि चेहऱ्यावरील प्रसन्न भाव यामुळे त्यांच्या मूर्ती पाहणाऱ्याला साक्षात श्री गणेशाचे दर्शन घडल्याचा अनुभव येतो.

प्रत्येक मूर्ती घडविताना निळकंठ गावडे संपूर्ण एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे काम करतात. आपल्या कलेत ते केवळ कौशल्यच नव्हे तर भक्ती, भावना आणि आत्मीयतेचीही जोड देतात. त्यामुळे त्यांच्या हातून साकारलेल्या प्रत्येक गणेशमूर्तीमध्ये एक वेगळे तेज आणि चैतन्य अनुभवायला मिळते. शांत, संयमी आणि मेहनती स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे.

आर्थिकदृष्ट्या साध्या कुटुंबातून आलेल्या निळकंठ गावडे यांनी संघर्षाला कधीही शरण न जाता कलेलाच आपले ध्येय मानले. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर आज समाजात एक प्रेरणादायी कलाकार म्हणून स्थान मिळविले आहे. त्यांच्या कलेमुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून, तरुण कलाकारांसाठी ते आदर्श ठरत आहेत.

आपल्या कलेविषयी बोलताना निळकंठ गावडे म्हणतात,या कलासंस्काराच्या ऋणात मी सदैव राहू इच्छितो. कारण कलेनेच मला संघर्षाच्या काळात आधार दिला, ताठ मानेने जगण्याची जिद्द दिली आणि याच कलेमुळे मला समाजात नावलौकिक मिळत आहे. त्यांच्या या शब्दांतून कलेविषयीची निष्ठा आणि समर्पण स्पष्टपणे दिसून येते.

कला, संस्कार आणि भक्ती यांचा सुंदर संगम साधणारे निळकंठ गावडे हे केवळ मूर्तिकार नसून भावनांना आकार देणारे कलाकार आहेत. त्यांच्या कलेचा प्रवास असा अखंड सुरू राहो, त्यांच्या हातून अधिकाधिक दर्जेदार कलाकृती साकारोत आणि त्यांच्या प्रतिभेला यश मिळो, अशाच भावना व्यक्त होत आहेत. संघर्षातून यशाचे शिल्प घडविणाऱ्या या अवलिया कलाकाराला पुढील कलाप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Leave a Comment

error: Content is protected !!