‘वसुंधरेचे अश्रू’ लघुपटाला तेजस मेघा फिल्म प्रोडक्शनतर्फे उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर
हेरवाड / प्रतिनिधी
तेजस मेघा फिल्म प्रोडक्शन निर्मिती संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित ‘लघुपट महोत्सव :२०२६’ मध्ये ‘वसुंधरेचे अश्रू’ या लघुपटाने उत्कृष्ट कलात्मकता आणि सामाजिक आशयाची छाप पाडत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकवले आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक प्रा.सचिन बेलेकर व निर्माता बाळासाहेब मोहिते यांचे या यशाबद्दल संस्थेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार,’वसुंधरेचे अश्रू’ या लघुपटातील प्रभावी कथानक,उत्कृष्ट दिग्दर्शन आणि सामाजिक संदेशाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.अशा सर्जनशील कलाकृतींमुळे मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार, ०८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत डॉ.मौलाना आझाद संशोधन केंद्र, टी.व्ही.सेंटर, हडको, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणार आहे.
या सोहळ्यात तेजस मेघा फिल्म प्रोडक्शनच्या निर्मात्या मेघा डोळस यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रा.सचिन बेलेकर यांच्या या यशामुळे कलाक्षेत्रातून व विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.