शिरोळ | प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने डॉ.जे.जे.मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ नगरपरिषदेच्या दिनबंधू दिनकररावजी यादव सभागृहात सर्वरोग निदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला नगरपरिषद पदाधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिराचे आयोजन शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. योगीता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, आरोग्य सभापती विजय आरगे तसेच सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने करण्यात आले.विशेषतः नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय विविध आजारांचे निदान करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात एकूण ६६ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना पुढील विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेखा चिपरीकर यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांना डॉ. समृद्धी चव्हाण, डॉ. प्रतिक्षा मेंढेकर, डॉ. समीक्षा पुजारी, डॉ. चव्हाण तेल्हारकर, डॉ. सुमीत राऊत तसेच आरोग्य सेविका पदमा गोटे आणि अप्सर पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरमन डॉ. अॅड. सौ. सोनाली मगदूम तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद बुद्रुक यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे आयोजित होणे आवश्यक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आरोग्य तपासणी, आजारांचे लवकर निदान आणि योग्य वेळी उपचार मिळाल्यास गंभीर आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येते. या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर कर्मचाऱ्यांसाठी तसेच नागरिकांच्या आरोग्य जनजागृतीसाठी उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.