पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर श्रीराम टायर येथे अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक बसून महिला जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला हा अपघात आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्यासुमार घडला.अपघातात मयत महिलेचे नाव अनिता सुरेश वाघमारे (वय ४७, रा. कोडोली, ता. पन्हाळा) असे आहे. तर जखमी पतीचे नाव सुरेश दादू वाघमारे असून त्याना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश दादू वाघमारे आणि त्यांच्या पत्नी अनिता वाघमारे हे दोघे आज आपली मोटारसायकल (एमएच ०९ ए व्ही ३३१) घेऊन गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. भेट आटोपून सायंकाळी ६ वाजण्यासुमार ते कोडोली येथील आपल्या घरी परत जात असताना ते श्रीराम टायर समोर आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पती सुरेश वाघमारे हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले, तर त्यांच्या पत्नी अनिता या रस्त्यावर पडल्या. यावेळी ट्रकची चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठविला.

Leave a Comment

error: Content is protected !!