शिरोळात टारे फ्यूएलमध्ये अत्याधुनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ, ग्रामीण भागातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध; पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील अर्जुनवाड रस्त्यावरील टारे फ्यूएल येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. ग्रामीण भागातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत असून, वाहनधारकांनी या सुविधेचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
हिंदुस्तान पेट्रोलियमचे कोल्हापूर विभागाचे सेल्स मॅनेजर समर रिझवी, गोवा विभागाचे इंजिनिअरिंग मॅनेजर दीपक भुसे तसेच इंजिनिअरिंग ऑफिसर संकेत मरूवाडा यांच्या हस्ते ईव्ही चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरातील मान्यवर, वाहनधारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना समर रिझवी यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियमकडून देशभरात अत्याधुनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारले जात आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरांसह ग्रामीण भागातही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे. या सुविधेमुळे प्रवासादरम्यान वाहनधारकांना सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह चार्जिंग सेवा मिळणार असून, पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.टारे फ्यूएलचे संचालक आणि टारे परिवाराच्या वतीने उपस्थित अधिकारी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे शिरोळ आणि परिसरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगसाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नसून, स्थानिक स्तरावर आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कार्यक्रमास सौ. स्नेहल टारे, उद्योगपती अशोकराव टारे, अविनाश टारे, अतुल टारे, श्रेणिक टारे, आदित्य टारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील वाहनधारक, व्यापारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात हरित ऊर्जेला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात आणखी वाढ होण्यास या सुविधेचा निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.