उदगावच्या कृष्णा नदीत बुडून १० वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू, पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींपैकी एकीचा मृत्यू,दुसरीला नागरिकांनी दिले जीवदान
उदगाव / प्रतिनिधी
उदगाव येथील कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन १० वर्षीय मुलींपैकी एकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीला स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे सुखरूप वाचविण्यात यश आले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.१० जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास उदगाव घाटावर घडली. या घटनेमुळे उदगाव परिसरात शोककळा पसरली आहे.या दुर्घटनेत कविता विठ्ठल साळुंखे (वय १०, सध्या रा. शिरोळ रोड, उदगाव, मूळ रा. कालवाडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर) हिचा मृत्यू झाला. तर प्रिया कालिदास चव्हाण (वय १०, रा. उदगाव) हिला स्थानिक नागरिकांनी नदीतून बाहेर काढून जीवदान दिले.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बापू शंकर चव्हाण हे नेहमीप्रमाणे कृष्णा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रिया आणि कविता या दोघीही नदीत उतरल्या. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात गेल्या आणि बुडू लागल्या.ही घटना लक्षात येताच बापू चव्हाण तसेच घाटावर उपस्थित नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून प्रिया हिला सुखरूप बाहेर काढले. मात्र, कविता पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाली. बाहेर आल्यानंतर प्रियाने, “बाबा, मी वाचले… पण आमची कविता गेली,” असे सांगत हंबरडा फोडला.त्यानंतर नागरिकांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली.काही वेळानंतर कविताचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.कविताचे आई-वडील हयात नसल्याने तिचा सांभाळ तिचे मामा शंकर चव्हाण करत होते.लहान वयातच तिच्यावर काळाने झडप घातल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने संपूर्ण उदगाव परिसर हळहळला असून, नदीकाठी पोहताना आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.