‘भावलेली माणसं’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन
शिरोळ / प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे मी सुभाष धुमे यांना एक सजग पत्रकार म्हणून ओळखतो. समाजातील अगदी बारीक-सारीक आणि संवेदनशील घटनांची नोंद त्यांच्या डोक्यात साठलेली असते, जी पुढे लेखणीच्या माध्यमातून ग्रंथाच्या रूपात समाजासमोर येते. राजहंसासारखं चांगलं तेवढं टिपण्याची वृत्ती त्यांच्यात आहे. भावलेली माणसं हे पुस्तक त्याच उत्तम उदाहरण आहे,” असे प्रतिपादन माजी राजू शेट्टी यांनी केले. ते सुभाष धुमे यांच्या भावलेली माणसं या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील प्रमुख उपस्थित होते. श्री. धुमे यांच्या गेल्या १० वर्षांत ५७ पुस्तकांची निर्मिती केली आहे. वयाच्या ८० व्या वर्षी ते तरूणाईच्या उत्साहाने सर्वत्र संचार करीत असातत. त्यांची ही पुस्तके त्यांच्या ५५ वर्षाच्या पत्रकारितेचा इतिहासच आहे, असे सांगून त्यांनी श्री. धुमे यांच्या लेखन कौशल्याचा गौरव केला.प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सुभाष धुमे केले. ते म्हणाले, “लोखंड सगळ्यांनीच पाहिलेलं असतं, पण परिस मात्र दुर्मिळ असतो. माझ्या आयुष्यात आलेली ही चांगली माणसं म्हणजे माझ्यासाठी ‘परिस’ आहेत, ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं. या पुस्तकात मला भावलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे चित्रणं रेखाटलेली आहेत. हा या मालिकेचा पहिला भाग असून, लवकरच याचा दुसरा भागही वाचकांच्या भेटीस येईल.” उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी या पुस्तकाचे कौतुक करताना वाचन संस्कृतीवर भर दिला. ते म्हणाले, “आजच्या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अशावेळी धुमे साहेबांसारखं ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व दर पंधरा दिवसाला एक पुस्तक लिहितं, हे कौतुकास्पद आहे. प्रत्येक माणसामध्ये काही चांगले तर काही वाईट गुण असतात. त्यातील चांगले गुण आत्मसात करून वाचकांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, हाच संदेश या पुस्तकातून मिळतो.”पुस्तकाचे प्रकाशक (तेजस प्रकाशन) रावासाहेब पुजारी यांनी धुमे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले. या कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक श्री देसाई, संचालक प्रमोद पाटील, श्रेणिक पाटील, प्रा. शांताराम कांबळे, प्राचार्य डॉ. सुनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.