“गोकुळ राजकीय घडामोड” यड्रावकरांच्या पाठबळावर गोकुळच्या रिंगणात उतरण्याचे कुलकर्णींचा दावा

Spread the love

“११०८ संस्थांचा मतदान हक्क वाचवला; आता शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यास तयार” – विद्याधर कुलकर्णी

शिरोळ / प्रतिनिधी

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, यड्रावकर गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांनी गोकुळच्या निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाठबळ दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास पूर्णपणे तयार असल्याचे जाहीर करून त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे.अब्दुललाट आणि परिसरात गेली तीन दशके सहकार व समाजकारणाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कुलकर्णी यांनी गोकुळ निवडणुकीपूर्वीच्या घडामोडींवरही भाष्य केले. काही मंडळींनी जिल्ह्यातील तब्बल ११०८ दूध संस्थांना अपात्र ठरवून त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला.मात्र या निर्णयाविरोधात सर्वप्रथम आवाज उठवत मोर्चा काढून विद्यमान संचालक मंडळाला निवेदन देण्याचे नेतृत्व आपण केले होते, असे त्यांनी सांगितले.या लढ्यामुळे अनेक अपात्र संस्थांना पुन्हा पात्रता मिळाली असून, त्यांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहिला आहे. शेतकरी व दूध उत्पादकांच्या न्याय्य हक्कासाठी केलेल्या या संघर्षाला यश मिळाल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.आपले वडील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कै. अनंतराव कुलकर्णी यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगताना त्यांनी शेतकरी विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिल्याचे नमूद केले. शेतकरी, दूध उत्पादक आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी आपला थेट संपर्क असल्याने गोकुळमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीत शिरोळ तालुक्याला प्रतिनिधित्व मिळावे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढत असल्याचे सांगत कुलकर्णी यांनी निर्णयाचा चेंडू आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कोर्टात टाकला आहे.त्यामुळे यड्रावकर गटाकडून त्यांना हिरवा कंदील मिळणार का? याकडे आता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.गोकुळ निवडणुकीच्या राजकारणात या घोषणेमुळे नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात राजकीय हालचाली अधिक वेगाने घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!