गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Spread the love

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणावर भर

इचलकरंजी | प्रतिनिधी

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज शनिवार दिनांक 20 जून रोजी सायंकाळी पाच वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार कार्यक्रमाचाही शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमात बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, आशिष शेलार, संजय सावकारे, जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. राहुल आवाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्था मानली जाते. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने आज मल्टी-स्टेट स्तरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये बँकेच्या ५५ शाखा कार्यरत आहेत.बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेच्या ठेवी २,९७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या असून कर्जवाटप १,८९४ कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.सौरऊर्जा,कृषी, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच तरुण उद्योजकांसाठी विविध कर्ज योजना राबवून बँक सहकार क्षेत्राला नवे बळ देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!