पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली सांगली फाटा येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या तिहेरी अपघातामुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला.मालवाहतूक टेम्पोने समोरील दोन कारना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने घडलेल्या या अपघातामुळे सुमारे दोन तास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. परिणामी पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला.दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू असताना पाठीमागून आलेल्या मालवाहतूक टेम्पो क्र.एम.एच.४३बी.जी ७९७७ या मालवाहू टेम्पो ने नियंत्रण गमावत पुढील दोन कार क्र.एम.एच.४३बी एन ८७८१व कार क्र.एम.एच.०९ एफ बी १३७० या कार ला जोरदार धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडकेनंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या मध्यभागीच उभी राहिल्याने वाहतुकीवर तात्काळ परिणाम झाला. कोल्हापूरकडे जाणारी वाहने जागच्या जागी थांबली, तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहनांचा वेग अत्यंत मंदावला. काही मिनिटांतच दोन्ही बाजूंना ट्रक, बस, कार आणि इतर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. शिरोली सांगली फाटा तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतुकीचा ताण वाढल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली आणि अडकलेल्या वाहनांना मार्ग मोकळा झाला.शिरोली सांगली फाटा हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा भाग मानला जातो. येथे वाढती वाहतूक, भरधाव वेग आणि सुरक्षित अंतर न राखण्याच्या सवयीमुळे वारंवार अपघात घडत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्तीची काटेकोर अंमलबजावणी, वेगावर नियंत्रण आणि सतत देखरेख ठेवण्याची गरज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.