पंचगंगा प्रदूषणावर खा धैर्यशील माने व उल्हास पाटील गप्प का? ७ वर्षांपूर्वीची पदयात्रा केवळ दिखावा ठरली का?

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यावर गंभीर आरोग्यसंकट ओढावले असून लाखो नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या गंभीर विषयावर लोकप्रतिनिधींची भूमिका संशयास्पद आणि निष्क्रिय असल्याचा आरोप युवा कार्यकर्ते धैर्यशील पाटील यांनी केला आहे.दिनांक ६ जानेवारी २०१९ रोजी माजी आमदार उल्हासदादा पाटील आणि खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली कुरुंदवाड येथील संगम घाट ते प्रयाग चिखलीपर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली होती.पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.त्यावेळी राहुरी कृषी विद्यापीठामार्फत नदीतील पाणी,माती तसेच भाजीपाल्यावरील रासायनिक अवशेषांची तपासणी करण्यात आली होती.या तपासणी अहवालात पंचगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रदूषित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही समोर आले होते. मात्र, त्यानंतर सात वर्षे उलटून गेली तरी नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत.उलट परिस्थिती अधिकच गंभीर बनल्याचा आरोप करण्यात येत आहे.धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, २०१९ च्या काळात शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्रमाण सुमारे पाच ते दहा टक्के होते. मात्र २०२६ पर्यंत हा आकडा सरासरी चौपटीने वाढल्याचे चित्र दिसत आहे.प्रदूषित पाणी, रासायनिक घटक आणि औद्योगिक सांडपाण्याचा वाढता प्रभाव यामुळेच हे संकट अधिक तीव्र झाल्याचा दावा त्यांनी केला.पंचगंगा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना दूषित पाणी, शेतीची हानी आणि वाढत्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे असताना हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी प्रदूषणाविरोधात अपेक्षित आक्रमक भूमिका घेतली नसल्याची भावना नदीकाठच्या नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन अंकुश संघटनेच्या माध्यमातून पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात सातत्याने लढा उभारण्यात आला आहे.नदीत सोडले जाणारे सांडपाणी, प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई आणि नदी शुद्धीकरणासाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.हा केवळ नदीचा प्रश्न नाही, तर पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.पंचगंगा वाचवायची असेल तर युवकांनी आता रस्त्यावर उतरून या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा. लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्यासाठी जनआंदोलन उभे करणे ही काळाची गरज आहे,असे आवाहन धैर्यशील पाटील यांनी केले.पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का,असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.नदी वाचविण्याची ही अखेरची संधी असल्याची भावना नदीकाठच्या परिसरात व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!