कोल्हापूर / शिरोळ प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.याबाबत मुंबई येथे बैठक झाल्याचेही समजते आहे.मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी. गोकुळच्या निवडणुकीत शिरोळ तालुका पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे.दरम्यान,आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे शिरोळ तालुक्यातील अनेक दूध संस्था आणि ठरावधारकांनी आपले ठराव सुपूर्द करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत यड्रावकर यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.केवळ गोकुळपुरतीच नव्हे, तर आगामी जिल्हा बँक आणि विधानसभा निवडणुकांच्या राजकीय समीकरणांचाही विचार करूनच ते आपली रणनीती आखणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.शिरोळ तालुक्यातील गट आणि मतदारसंघनिहाय मतदानाची ताकद लक्षात घेता,गोकुळची निवडणूक ही भविष्यातील विधानसभा आणि जिल्हा बँक निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे.त्यामुळे कोणता गट भविष्यात कायमस्वरूपी सोबत राहील, कोणत्या नेतृत्वाला बळ द्यायचे आणि कोणत्या राजकीय समीकरणातून जास्तीत जास्त फायदा होईल, याचा बारकाईने विचार यड्रावकर करत असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.विशेष म्हणजे, गोकुळच्या निवडणुकीतील प्रत्येक निर्णयाचा परिणाम पुढील मोठ्या निवडणुकांवर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची नजर यड्रावकर यांच्या भूमिकेकडे लागली आहे.शिरोळ तालुक्यातील ठरावांची वाढती संख्या आणि विविध गटांची सुरू असलेली मोर्चेबांधणी यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.रवींद्र माने यांना संधी मिळणार की माजी आमदार उल्हास पाटील यांच्यावर विश्वास दाखवला जाणार,याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीतील उमेदवारीचा अंतिम निर्णय हा केवळ शिरोळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.