श्री १०८ कुंथुसागर महाराज यांचा ८० वा वर्षवर्धन महोत्सव उत्साहात; १४१ फूट उंच जैन धर्म ध्वजदंड ठरला आकर्षण
हातकणंगले / प्रतिनिधी
सध्या सर्वत्र वाढत चाललेल्या हॉटेल संस्कृतीमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे मानवाच्या शरीरासाठी शुद्ध, सात्विक आणि शाकाहारी आहाराची आवश्यकता असून शाकाहार हाच सर्वोत्तम आहार असल्याचे प्रतिपादन श्री १०८ गणाधिपती गणधराचार्य जगद्गुरू कुंथुसागर महाराज यांनी केले.
आळते (ता. हातकणंगले) येथील पवित्र श्री कुंथुगिरी क्षेत्रावर आयोजित धार्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जगद्गुरू श्री १०८ कुंथुसागर महाराज यांचा ८० वा वर्षवर्धन महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.जगद्गुरू कुंथुसागर महाराज म्हणाले, सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडेल आणि बळीराजा सुजलाम-सुफलाम होईल. पावसामुळे शेतीसह समाजजीवनातही समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. समाजात सुख, शांती आणि समाधान नांदण्यासाठी संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी एकत्र कुटुंब व्यवस्थेचे महत्त्वही विशद केले.आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत असून मुले आणि सुना वयोवृद्ध आई-वडिलांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंध कमकुवत होत असून तरुण पिढीला संस्कार आणि संस्कृतीचे धडे मिळत नाहीत. परिणामी अनेक कुटुंबे भरकटत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.या धार्मिक सोहळ्यात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी,जिनसेन महास्वामी,धर्मसेन महास्वामी आणि पद्मकीर्ती महास्वामी यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांच्या प्रवचनातून धर्म,संस्कार,अहिंसा आणि समाजहिताचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. अशोकराव माने (बापू), माजी आमदार प्रकाश आवाडे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, उत्तम पाटील (बोरगावकर), कुंथुगिरी ट्रस्टचे पदाधिकारी, जैन समाजातील श्रावक-श्राविका आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन बालब्रह्मचारी जयश्रीदीदी, सुधीर पाटील आणि पूनम पहाडे यांनी केले. तीन दिवस चाललेल्या धार्मिक विधींचे आयोजन अमित लोलावत (उदयपूर), भरत काला (इंदौर), विजय शहा (मुंबई), सुनील गडिया (मुंबई), कमल जैन (दिल्ली), दिनेश जैन (दिल्ली), प्रतीक बडजात्या (हरदा) आणि बबीता सरावगी (बेंगळुरू) यांच्या हस्ते करण्यात आले. भोजन व्यवस्थेची जबाबदारी सचिन व संतोष ताराचंद पाटणी (संभाजीनगर) यांनी यशस्वीपणे पार पाडली.
१४१ फूट उंच जैन धर्म ध्वजदंड ठरला प्रमुख आकर्षण
तीन दिवसांच्या या भव्य धार्मिक महोत्सवात श्री क्षेत्र कुंथुगिरी येथे तब्बल १४१ फूट उंचीचा जैन धर्म ध्वजदंड उभारण्यात आला. या ध्वजदंडाचे लोकार्पण जगद्गुरू आचार्य श्री १०८ कुंथुसागर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. दहिवडी येथील उद्योजक भरतेश गांधी यांनी हा ध्वजदंड दान स्वरूपात दिला आहे.महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा हा जैन धर्म ध्वजदंड पाहण्यासाठी राज्यभरातील जैन बांधवांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी चांगला पाऊस पडावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे यासाठी जगद्गुरू कुंथुसागर महाराज यांनी विशेष मंत्र दिले असून भाविकांनी नियमित मंत्रोच्चार करण्याचे आवाहन केले.धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देणारा हा वर्षवर्धन महोत्सव भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला.