पंचगंगा प्रदूषणाच्या लढ्यात आंदोलकांना धमकावण्याचा आरोप; वाहनांची तोडफोड, तहसीलदारांनी पाहणी थांबवली
शिरोळ | प्रतिनिधी
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर प्रशासन, प्रोसेस उद्योग मालक आणि आंदोलनकर्ते यांच्यात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शुक्रवारी (५ जून) झालेल्या स्थळ पाहणीत मोठा गोंधळ उडाला. काही प्रोसेस मालकांनी बाहेरून आणलेल्या गुंडांच्या माध्यमातून आंदोलकांना धमकावून दादागिरी केल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यांनी केला आहे.अशा प्रकारची गुंडगिरी पुन्हा झाल्यास इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता रोखण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला.पंचगंगा नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नावर ४ जून रोजी प्रांत कार्यालयात प्रशासन, आमदार राहुल आवाडे, प्रोसेस उद्योग मालक आणि आंदोलनकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सांडपाणी व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिलेल्या १०६ एकर जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाचे अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि आंदोलनकर्ते संबंधित जागेवर गेले होते.मात्र पाहणीदरम्यान वातावरण तापले. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रोसेस मालकांच्या समर्थकांनी अरेरावी करत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या वाहनाची चारही चाके पंक्चर करण्यात आली, तर तालुका अध्यक्ष नागेश काळे यांच्या वाहनाचेही नुकसान करण्यात आले. पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्यासाठी लढणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याने शिरोळ तालुक्यात संतापाची भावना व्यक्त होत आहे.या प्रकारामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचे लक्षात घेत इचलकरंजीचे तहसीलदार श्री. खिलारी यांनी शेत पाहणीचे पुढील काम तात्काळ थांबविले आणि संबंधित घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
“१०६ एकरांपैकी दाखवलेली ३ एकर जमीन प्रत्यक्षात फक्त १९ गुंठे”
“सांडपाणी व्यवस्थापनासाठी उपलब्ध केल्याचा दावा करण्यात आलेली १०६ एकर जमीन पाहण्यासाठी गेलो असता, प्रोसेस मालकांनी दाखविलेली ३ एकर जागा प्रत्यक्षात केवळ १९ गुंठे निघाली. सत्य बाहेर येणार हे लक्षात आल्यानंतर दादागिरीचा मार्ग अवलंबण्यात आला. मात्र अशा गुंडगिरीला आम्ही घाबरणार नाही. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही,” असे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी ठामपणे सांगितले.