शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ व परिसरातील मुस्लिम बांधवांनी पवित्र बकरी ईद मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि भक्तिभावाने साजरी केली. गुरुवारी सकाळी शिरोळ येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. पहाटेपासूनच ईदगाह मैदान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नव्या पोशाखात आलेल्या मुस्लिम बांधवांनी मोठ्या श्रद्धेने ईदची नमाज अदा केली.पवित्र आणि शांततामय वातावरणात नमाज पठण करताना जागतिक शांतता, देशाची एकता व अखंडता तसेच समाजातील जातीय सलोखा कायम राहावा यासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले. देशात बंधुभाव, सौहार्द आणि शांतता नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. नमाज पूर्ण झाल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.बकरी ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सरपंच गजानन संकपाळ, दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, नगरसेवक विजय आरगे, पत्रकार चंद्रकांत भाट, सामाजिक कार्यकर्ते शक्तीजीत उर्फ चिकू गुरव यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिरोळ पोलीस प्रशासनाच्या वतीनेही ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.ईदगाह मैदानावर हाफिज तौफिक मुल्ला, अमीरोद्दीन शेख, हाफिज इलियास बागसार व मुफ्ती मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. यावेळी विश्वशांती आणि मानवतेच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. धार्मिक कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन समस्त शिरोळ मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरोळ पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाजानंतर शिरोळ पोलिस ठाण्याच्या वतीने उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.एकात्मता, बंधुभाव, शांतता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणारा हा पवित्र सण शिरोळमध्ये अत्यंत आनंदी, उत्साही आणि शांततामय वातावरणात पार पडला.