चौथ्या राष्ट्रीय संत परिषदेत मानाचा सन्मान; शिरोळ तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव
शिरोळ / प्रतिनिधी
महान तीर्थक्षेत्र श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या ‘चौथी राष्ट्रीय संत परिषद व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्या’त शिरोळ येथील रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष,शिरोळभूषण ह.भ.प. दिलीपराव रामचंद्र माने यांना ‘राष्ट्रीय हिंदू समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आल्याने शिरोळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.अयोध्येच्या पवित्र भूमीत अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा भव्य सोहळा पार पडला. राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री कर्मयोगी भिकू (दादा) रामजी इदाते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. देशभरातील संत-महंत, धार्मिक नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा विशेष दिमाखात पार पडला.पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ह.भ.प. दिलीपराव माने व सौ. सुजाता माने यांना शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन ‘राष्ट्रीय हिंदू समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.ह.भ.प. दिलीपराव माने यांनी अनेक वर्षांपासून धार्मिक जागृती, समाजप्रबोधन, वारकरी परंपरेचा प्रचार-प्रसार, भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. श्री रेणुका भक्त मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजात अध्यात्मासोबतच संस्कारांची जोपासना करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे शिरोळ तालुक्यात धार्मिक आणि सामाजिक चळवळींना नवे बळ मिळाले असल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.या प्रसंगी महंत श्री श्री प्रेममूर्ती कृष्णकांत दास (संत श्री सिद्धपीठ हनुमानगढी, अयोध्या), श्री श्री १००८ ह.भ.प. शनिभक्त सुखदेव महाराज (वाशी नेवापूर), कोल्हापूर येथील साई मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गुंडा गायकवाड, ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ), श्रद्धानंद वाजपेयी (मुंबई), अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीचे प्रमुख भागवताचार्य ह.भ.प. अतुल महाराज आदमाने यांच्यासह अनेक संत-महंत तसेच शिरोळचे धनाजी पाटील नरदेकर, डॉ. अप्पासो पुजारी, बाळासाहेब कोळी (दिवाण), रामचंद्र पाटील, बापूसाहेब गंगधर, श्रीपतराव पाटील, भाऊसो माळी, बाळासाहेब माने-ताराप, बाळासाहेब बन्ने, राजेंद्र चव्हाण, बाबासो पूदें, तानाजी जाधव, अभिजीत माने यांच्यासह माने परिवार आणि शिरोळ तालुक्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीराम जन्मभूमी अयोध्या यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करून ह.भ.प. दिलीपराव माने यांनी शिरोळ तालुक्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिरोळ तालुक्यात सर्व स्तरांतून आनंद व्यक्त होत असून, विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शिरोळसह परिसरातील अनेक संस्थांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव म्हणून मिळालेला हा पुरस्कार भविष्यातील कार्याला अधिक प्रेरणा देणारा ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.