नागाव फाटा येथे अपघात पुलाची शिरोलीतील कामगार ठार 

Spread the love

 पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात शिरोली येथील ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.इंजिनिअरिंग कॉलेजच्या बसने दिलेल्या धडकेमुळे हि घटना घडली .पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीचे नाव बिरदेव संदीपान ऐवळे (वय ४९, रा. शोभा नगर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे आहे. बिरदेव ऐवळे हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत कार्यरत होते. आज सकाळी नाईट शिफ्ट आटोपून ते घरी आले होते. आंघोळ आणि नाश्ता उरकल्यानंतर, ते आपल्या सायकलवरून श्रमिक कामगार कार्यालयातील एका मिटिंगसाठी निघाले होते हायवे ओलांडून नागावच्या दिशेने जात असताना, मागून भरधाव येणाऱ्या वठार येथील अशोकराव माने इंजिनिअरिंग कॉलेजच्या हुपरी-रेदाळ मार्गावरील बसने (क्रमांक एमएच ०९ सीव्ही ७१९) त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली.या अपघातात ऐवळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना त्वरित उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.बिरदेव ऐवळे मूळचे लक्ष्मी नगर सांगोला येथील असून ते कामानिमित्त गेल्या ३० वर्षां पासून पुलाची शिरोली येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिरोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्तरीय कार्यासाठी पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!