प्रा.आ. केंद्र शिरोली (पु.) येथे जि.प. सदस्यांची सदिच्छा भेट

Spread the love

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली (पु.) येथे जिल्हा परिषद सदस्य व जनआरोग्य समिती अध्यक्ष सलीम महात तसेच जि.प. सदस्य हेरले जनआरोग्य समितीचे सहअध्यक्ष अतिश शिंगे यांनी सदिच्छा भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली.भेटीदरम्यान दोन्ही जि.प. सदस्यांनी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा, औषधोपचार, स्वच्छता व्यवस्था तसेच कर्मचारी वर्गाचे कार्य याबाबत माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अॅन्ड्रयुज यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजना, माता-बाल संगोपन सेवा, लसीकरण मोहिमा, आपत्कालीन सेवा तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू असलेल्या उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधा आणि भविष्यात आवश्यक असणाऱ्या पायाभूत गरजांबाबतही त्यांनी दोन्ही सदस्यांशी चर्चा केली.जि.प. सदस्य मा. श्री. अतिश शिंगे यांनी त्यांच्या मतदारसंघातील मौजे वडगाव व हालोंडी येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, औषध साठा, कर्मचारी उपलब्धता तसेच आवश्यक पायाभूत सुविधांविषयी माहिती घेतली. ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत अधिक चांगल्या सेवा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.दोन्ही जि.प. सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली (पु.) येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आरोग्य कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने तत्पर असून ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अॅन्ड्रयुज, आरोग्य कर्मचारी, दीपक यादव, धनाजी पाटील, शिवाजी कोरवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदिच्छा भेटीद्वारे आरोग्य सेवांचा घेतलेला आढावा आणि नागरिकांशी साधलेला संवाद यामुळे आरोग्य केंद्रातील वातावरण अधिक उत्साही झाले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!