गोवा कराड पर्यंत पसरलं जाळ; फुलाची शिरोली प्रकरणात धक्कादायक पुरावे हाती

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

पुलाची शिरोली प्रकरणात आक्षेपार्ह साहित्य जप्त कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले असून तपासाची व्याप्ती जिल्ह्याबाहेर जाऊन गोवा आणि कराडपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामी केल्याच्या आरोपांमुळे शाहिद समीर सनदे आणि शाहरुख हुसेन देसाई यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने तपासाला वेग देत विविध अंगांनी चौकशी सुरू केली आहे. शुक्रवारी सायंकाळी एसआयटी आणि स्थानिक पोलिसांनी पुलाची शिरोली येथे संयुक्त कारवाई करत आरोपींच्या घरांवर छापे टाकले.या छाप्यात पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच काही संशयास्पद आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. तपासासाठी ही सामग्री अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात आरोपींच्या नातेवाईकांचीही पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून आरोपींचे नेटवर्क, हालचाली आणि इतर संभाव्य साथीदारांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहत असून कोणतीही बाब दुर्लक्षित न ठेवता प्रत्येक दुव्याची छाननी केली जात आहे.यानिमित्ताने बाहेरगावी संपर्कातील विश्वासू आलेल्या महिलांनाही लक्ष्य केल्याची माहिती पुढे येत आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. आरोपींनी पीडित महिलांना पर्यटनाच्या नावाखाली विविध भागात नेऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या संदर्भात पोलिसांकडून विविध ठिकाणी चौकशी केली जात असून, संबंधित हॉटेल्स, कॅफे,लॉजेस आणि इतर ठिकाणांची माहिती गोळा केली जात आहे.या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण पुलाची शिरोली परिसरात उमटले असून विविध हिंदुत्ववादी संघटना ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदविला आहे.आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि पीडितांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी आंदोलने करण्यात येत आहेत. वातावरण तणावपूर्ण असले तरी पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ज्यांच्याकडे या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती आहे किंवा जे कोणी पीडित असतील त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.सध्या एसआयटीच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!