शिरोळ / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांचा मंगळवारी दि. ५ मे रोजी कोल्हापूर आणि शिरोळ तालुक्यात नियोजित दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीत नवचैतन्य निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून,आठवड्याभरात दुसऱ्यांदा शिरोळला दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.दौऱ्याची सुरुवात पहाटे कोल्हापूर येथील श्री जोतिबा मंदिरात दर्शनाने होणार आहे. त्यानंतर कुंभोज येथे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन करण्यात येणार आहे.सामाजिक बांधिलकी जपत टाकळीवाडी येथे शहीद जवान रोहित खत्रीकुडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे.यानंतर शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद आणि शेडशाळ येथे ‘क्षारपड जमिनी’ सुधारणा प्रकल्पाची पाहणी करण्यात येणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत असून, कृषी विकासाबाबत आमदार पवार प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.दुपारनंतर नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.शिरोळ येथील टारे क्लब हॉलमध्ये आयोजित संवाद मेळाव्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे. या संवादातून आगामी राजकीय रणनीतीचे संकेत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दौऱ्याचा समारोप आझाद मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याने होणार आहे.दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाविकास आघाडीला या दौऱ्यामुळे बळकटी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी हा दौरा निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.