पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
प्रेम प्रकरणाचा गैरफायदा घेत स्थानिक मुलींचे, महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे बदनामी केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे पुलाची शिरोली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणातील अटक आरोपींना पेठ वडगांव न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने तपासाला गती मिळाली आहे.महाविद्यालयीन तरुणींना , महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणे, त्याद्वारे ब्लॅकमेल करत मानसिक व शारीरिक शोषण केल्याच्या आरोपामुळे हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.या प्रकरणात पोलिसांनी मुख्य शाहीद समीर सनदे सहआरोपी शारूख हूसेन देसाई या साथीदारला अटक केली असून त्यांना पेठ वडगांव न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. तपासादरम्यान मोबाईल, इलेक्ट्रॉनिक पुरावे, सोशल मीडियावरील व्यवहार तसेच आणखी काही पीडित तरुणींच्या तक्रारींचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.घटनेनंतर पुलाची शिरोली परिसरातील बजरंग दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी , डॉक्टर असोशियन ,मेडिकल असोसिएशन, व्यापारी वर्गातून ,ग्रामस्थ व महिला वर्गातून संताप व्यक्त करण्यात आला. दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, संबंधित प्रकरणाची एस आय टी मार्फत सखोल चौकशी करून इतर आरोपींनाही जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी ,ग्रामस्थ यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकाची मागणी केली आहे.दरम्यान, या घटनेमुळे पालकवर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तरुणींना सुरक्षितता देण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.या प्रकरणातील तपास अधिक व्यापक पातळीवर सुरू असून आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सहा दिवसांच्या पोलीस कोठडीतून या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.