पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथे उघडकीस आलेल्या हिंदू मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने या गंभीर गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा तथा गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुलाची शिरोली परिसरात दोन मुस्लिम युवकांनी हिंदू समाजातील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे गावासह संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी पुलाची शिरोली येथे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या आंदोलनात ग्रामस्थ, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या आंदोलनावेळी आमदार अमल महाडिक यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचा एसआयटीमार्फत तपास व्हावा, तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार सौ. शौमिका महाडिक यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.या निवेदनात या प्रकरणामागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेऊन संबंधित आरोपींसह त्यांच्या साथीदारांची चौकशी करण्यात यावी, या प्रकरणात आणखी पीडित तरुणी असण्याची शक्यता तपासावी, तसेच सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता नियमित पोलीस तपासाबरोबर स्वतंत्र एसआयटी स्थापन करून निष्पक्ष व सर्वंकष चौकशी होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या या मागणीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, या गंभीर प्रकाराची चौकशी अधिक व्यापक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषींना कठोर शासन होऊन पीडितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.यावेळी खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे आदी उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी व्हावा आणि दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी सर्व पातळ्यांवर पाठपुरावा केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.