शिरोळ / प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, नागरिकांनी आपले हक्क, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या जाणून घ्याव्यात या उदात्त हेतूने नांदणी बँकेचे वसुली अधिकारी संजय शांताबाई भिमराव ढाले यांनी कौतुकास्पद उपक्रम राबवला. आपल्या आई दिवंगत शांताबाई ढाले यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी कुरुंदवाड परिसरात तब्बल १५० घरांमध्ये तसेच शाळा, महाविद्यालये आणि वाचनालयांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप केले.या उपक्रमामागे केवळ स्मरण नव्हे, तर सामाजिक जाणीव जागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे दिसून आले. आजच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत नागरिकांनी संविधान समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच जाणिवेतून ढाले यांनी हा उपक्रम हाती घेतला.दिवंगत शांताबाई ढाले यांनी आपल्या आयुष्यात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी कार्य केले. त्यांच्या त्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार संजय ढाले यांनी या उपक्रमातून व्यक्त केला.संविधान वाटप करताना नागरिकांमध्ये उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. अनेकांनी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगत अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची गरज व्यक्त केली. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.संविधान फक्त पुस्तक न राहता ते प्रत्येकाच्या आचरणात उतरावे, हीच खरी आदरांजली ठरेल,अशी भावना संजय ढाले यांनी व्यक्त केली. समाजात बंधुता, समता आणि न्याय या मूल्यांची जपणूक व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमामुळे कुरुंदवाड परिसरात एक सकारात्मक सामाजिक संदेश पसरला असून ‘घराघरात संविधान, मनामनात संविधान’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा हा एक प्रभावी प्रयत्न ठरला आहे.