शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक शाहुल कोळी यांनी माजी खासदार राजू शेट्टी, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील तसेच यादव पॅनेलचे प्रमुख नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव यांच्या उपस्थितीत शिव – शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिरोळ नगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून आल्याचे चित्र आहे.यावेळी बोलताना नगरसेवक शाहुल कोळी म्हणाले की, शिरोळ शहरासह आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची प्रभावी सोडवणूक करण्यासाठी सत्तेत राहून काम करणे आवश्यक आहे. शिव – शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे सर्व नेतेमंडळी आणि पॅनेल प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव हे शहर व प्रभागाच्या विकासासाठी निश्चितच सकारात्मक योगदान देतील, असा विश्वास वाटत असल्याने आपण यादव पॅनेलमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शाहुल कोळी यांच्या प्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, पॅनेल प्रमुख नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव, शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, युवा नेते सौरभ शेट्टी, नगरसेवक विजय आरगे, राहुल कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य परवेज मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या सर्वांच्या हस्ते नगरसेवक शाहुल कोळी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिव–शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलमधील सर्व नेतेमंडळी कटिबद्ध आहेत.राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. विकासकामांमध्ये पारदर्शकता राखून शहरातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरणारा कारभार करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला शिव – शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाहुल कोळी यांच्या प्रवेशामुळे शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.