शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ दत्त साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२५ /२६ साठी जाहीर केलेला ऊस दर शेतकऱ्यांच्या नाराजीचे कारण ठरला आहे.कारखान्याने दर ३४०० रुपये विना कपात एकरकमी व हंगामाच्या शेवटी अतिरिक्त ७७ रुपये देण्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे.मात्र हा दर व कारखान्याने प्रसिद्ध केलेले पत्र दिशाभूल करणारे असून,शेतकऱ्यांच्या संघटनांशी कोणतीही चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा यासाठी सतत मागण्या केल्या जात असताना, कारखान्याकडून घेतलेला हा निर्णय हेतूपुरस्सर आणि अन्यायकारक असल्याचे चुडमुंगे यांनी म्हटले आहे.त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या दरावर कोणत्याही परिस्थितीत ऊस तोडणी सुरू होणार नाही.जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय्य दराचा निर्णय होत नाही,तोपर्यंत कोणीही ऊस तोडणी किंवा वाहतूक करू नये.जर कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस जबरदस्तीने तोडला किंवा वाहतूक केला गेला,तर त्यातून होणाऱ्या नुकसानीसाठी कारखाना स्वतः जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे.आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करत लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये या दराविषयी तीव्र नाराजी असून,योग्य दराची मागणी करण्यासाठी परिसरातील विविध शेतकरी संघटना एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कारखान्याच्या दरनिर्णयावर पुढील काही दिवसांत तोडगा निघेल की संघर्ष पेट घेईल,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.