१४० किलोमीटरवरून दालमिया शुगरला ऊस वाहतूक, स्वाभिमानी ऊसाचे ट्रॅक्टर परत पाठवले रायबागला 

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

कर्नाटक राज्यातील सर्व साखर कारखाने बंद असल्याने तेथील ऊस मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने विनापरवाना पद्धतीने गाळप करीत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील यांनी आज बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता समोर आणली आहे.यावेळी विक्रम पाटील म्हणाले दालमिया शुगर कारखान्याचा गळीत हंगाम जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर एफआरपी दरांमध्ये छेडछाड केल्याच्या कारणावरून स्थगित करण्यात आला होता.मात्र, तरीदेखील संबंधित कारखान्यात ऊस गाळप सुरू असल्याचे उघड झाले आहे.या संदर्भात पाहणीसाठी गेलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना रायबाग परिसरातून सुमारे १४० किलोमीटर अंतरावरून ऊस वाहतूक करून आणणारे चार ट्रॅक्टर आढळून आले.हे ट्रॅक्टर ऊसासह पुन्हा रायबागकडे रवाना करण्यात आले.संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.दरम्यान,एफआरपी संदर्भात नियमांचे उल्लंघन करून ऊस गाळप करून कारखान्याने शासनाच्या आदेशांची पायमल्ली केल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.त्यामुळे दालमिया शुगरचा यंदाचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा,अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून कारखान्याविरुद्ध कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!